सध्या देशाभरात विविध समाजात फूट पाडण्याला, समाजाचा बुद्धीभेद करण्याला सुगीचे दिवस आहेत. त्यामुळेच काही तथाकथित अभिजन वर्गाकडून ठरवून सामान्यांची दिशाभूल केली जातेय. अर्थात हे काही आजच घडतेय असे नाही. त्याला 90 ते 95 वर्षाची पार्श्वभूभी आहे. फरक इतकाच की पूर्वी ती शाहू महाराजांविरोधात केली गेली आज ती केंद्र सरकारच्या विरोधात केली जातेय. शाहू महाराज हे संस्थानिक होते. त्यांच्या अंतर्गत समाजातील अनेक संस्थांना अनुदान दिले जात असत. मात्र त्यांच्याच अनुदानावर आपली पोटं भरणार्या काही कथित अभिजन वर्गाकडूनच त्यांच्यावर टीका केली जात असे.
टीका करण्याचे स्वातंत्र्य शाहू महाराजांनी नेहमीच मान्य केले होते. परंतु त्यांच्या भाषणातील सोयीचे आणि समाजाची दिशाभूल होईल अशी वाक्ये वृत्तात वा भाषणात संदर्भ म्हणून दिली जाऊ लागली त्यावेळी महाराज संतापले. व्यथित झाले. त्यावेळी त्यांनी एका भाषणात आपली भूभिका स्पष्ट केली. ते नाशिक येथील भाषणात म्हणतात, "'राजकारण'कर्त्यासारख्या मजवर टीका करणार्यास माझी विनंती आहे की, त्यांनी माझे समग्र भाषण देऊन प्रत्येक पॅराग्राफसमोर आपली स्वतःची जी टीका असेल ती छापावी. असे केले म्हणजे लोकांस आपले मत देण्यास बरे पडेल. अर्धाअधिक मजकूर गाळून थोडेसे अवतरण घेतल्याने, माझ्या सांगण्याचा विपर्यास होतो. 'राजकारण'कर्त्यास अशी विनंती करणे, हे मी मोठे धाडस करितो अशीही भीती वाटते. कारण मग त्यास विरूद्ध टीका करण्यास स्थळे कमीच सापडतील." हा शाहू महाराजांच्या भाषणातील एक उताराच त्याकाळच्या तथाकथित बुद्धीवादी अभिजन वर्गाचा खरपूस समाचार घेणारा ठरतो.
शाहू महाराजांवर जे टीका करत असत त्यापैकी बरेच जण महाराजांकडून मिळत असलेल्या अनुदानावरच जगत असत. विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांचीच बदनामी करण्यात आपला वेळ आणि बुद्धी खर्ची घालत. आजही नेमके तेच होत आहे. पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूट, हैदराबाद विद्यापीठ, जेएनयू विद्यापीठ या सर्व राष्ट्रीय शिक्षणसंस्था केंद्र सरकारच्या अनुदानावर चालतात. सरकार कोट्यवधींचा खर्च त्यावर करीत असते. त्याच पैशावर तेथील तथाकथित बुद्धीवंत, प्राध्यापक, विद्यार्थी आपल्या सर्व गोष्टी भागवतात. त्यांचे म्हणणे आहे की, आमचा सर्व खर्च आजवरच्या कॉंग्रेस सरकारप्रमाणे मोदी सरकारने उचचला पाहिजे. त्या बदल्यात आम्ही त्याच सरकारची निंदानालस्ती करू. त्यांच्या कामात अडथळे आणू. त्यांना शिव्या घालू. शिवाय असे केल्याबद्दल त्यांनी आम्हाला शाब्बासकी द्यावी. शाहू महाराजांचे नाव घेऊन त्यांचा पुरोगामी वारसा सांगणारे त्यांचे अनुयायी आज नेमके उलट वागत आहेत. अखिल समाजाला ओलीस ठेवणार्या वृत्तीची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी शाहू महाराजांनी मोहीम उघडली त्याच मक्तेदारीसाठी लढणार्यांना आज दुर्दैवाने पुरोगामी म्हणावे लागतेय.
नव्या आशा, आकांक्षा घेऊन कार्यरत झालेल्या मोदी सरकारला बदनाम करण्याचा डाव सुरू झाला तो पुण्यातील एएफटीआयच्या विद्यार्थ्यांकरवी. गजेंद्र चौहान यांची एफटीआयच्या प्रमुखपदी निवड केल्यानंतर, चौहान त्या पदास लायक नाहीत अशी री ओढत तेथील विद्यार्थ्यांनी विरोधाला सुरूवात केली. आंदोलने केली. आजही ती सुरूच आहेत. मात्र एक मुद्दा ऐरणीवर येतो तो म्हणजे, आपले प्रमुख कोण असावे किंवा कोण नसावे हा अधिकार विद्यार्थ्यांना कोणी दिला? मुळातच एखाद्याची कार्यपद्धती समजून घेण्याआधीच त्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे, पोटात असलेल्या बाळाने आपला बाप निष्क्रीय असल्याने मला तो नको आहे असे म्हणण्याचाच हा प्रकार.
दुसरी घटना आहे ती, हैदराबाद येथील रोहित वेमुला या विद्यार्थ्याची आत्महत्या. तेथेही अशाच पद्धतीने कांगावा करण्यात आला. मुळात रोहितची सुसाईड नोट वाचल्यानंतरच लक्षात येते की, त्याने आत्महत्या का केली. त्यात त्याने कोणाला दोषी मानले आहे. तरीही तो विषय बाजूला ठेवून केवळ त्याचे राजकारण करण्यात आले. एखाद्याच्या मृत्यूचा मसाला बनवून आपली नाव करण्याची ही डाव्यांची पद्धत काही आजची नाही. येनकेनप्रकारेन सरकारच यात कसे दोषी आहे याचाच हा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. पुढची घटना आहे ती, दिल्लीस्थित जेएनयु विद्यापीठातील राष्ट्रविरोधी घोषणाबाजीची. या प्रकरणातही अशाच पद्धतीने कांगावा करण्यात आला. कारण कविता वाचनाच्या नावाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे स्वरूप बदलून त्याला विद्रोही स्वरूप देण्याचा प्रकार विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर विद्यापीठाने कार्यक्रमाची परवानगी रद्द केली. याचा राग मनात ठेवून तेथील फुटीरतावादी समर्थक उमर खालीद, कन्हैय्या कुमार यांच्या चमूने भारतविरोधी घोषणाबाजी केली. याबद्दल तेथील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमारला अटक झाली. याशिवाय कार्यक्रमाचा आयोजक उमर खालीद आणि संबंधित विद्यार्थी पळून गेला. त्यानंतर कन्हैय्या कुमारच्या बचावासाठी अखिल डाव्या संघटना आणि त्यांचे समर्थक पुढे सरसावले. सुरवातीला या विद्यार्थ्यांनी अशा घोषणा दिल्या नाहीत. विद्यार्थ्यांना हकनाक अशा घटनांमध्ये गोवले जात असल्याचा आरोप काही महाभागांनी टाहो फोडून सांगायला सुरूवात केली. त्यानंतर काही परिस्थितीजन्य पुरावे समोर आल्यानंतर मात्र याचा सूर बदलला. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी ते करू लागले. त्यानंतर एबीवीपीच्या कार्यकर्त्यांनीच देशविरोधी घोषणा दिल्याचा कांगावा सुरू केला. कांगावेपणाची ही हद्दच होती.
जर का उमर खालीदसह त्या मुलांनी घोषणा दिल्या नव्हत्या तर ते विद्यार्थी चार दिवसानंतर पोलिसांना शरण का आले? याशिवाय राहुल गांधी, अरविंद केजरीवाल वा अन्य डाव्यांनी या विरोधात कोर्टात धाव का नाही घेतली? न्यायव्यवस्थेवर यांचा विश्वास नाही का? त्यांना ही गोष्ट पक्की ठाऊक होती की, या प्रकरणात आपण जर का कोर्टात गेलो तर आपण उघडे पडू. कारण घोषणा देण्यार्यांचे चेहरे आज ना उद्या समोर येणारच आहेत. याशिवाय कॉंग्रेस आणि डाव्यांनी केलेल्या दादरी प्रकरणाचे भांडवल. ज्या अखलाकची हत्या करण्यात आली तो मुस्लिम होता. त्याची हत्या ही गोमांस खाल्ल्ङ्माने करण्यात आल्याचा कांगावा या पुरोगामी मुखंडांनी केला होता. त्यानंतर त्याचा निषेध म्हणून पुरस्कार वापसीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. या सर्व प्रकारणांकडे पाहिल्यास एक स्पष्ट आहे की, हे सर्वप्रकार घडले कोठे? रोहित वेमुलाची घटना घडली आंध्रप्रदेश आणि तेलंगना राज्यात म्हणजेच तेलगू देसम पक्षाचे चंद्रबाबू नायडू आणि टीआरएस पक्षाची सत्ता असलेल्या के. सी. राव यांच्या सरकारमध्ये. दादरी हत्या प्रकरण घडले समाजवादी पार्टीची सत्ता असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये. जेएनयु प्रकरण घडले केजरीवाल यांची सत्ता असलेल्या दिल्लीत. म्हणजे याती एकही प्रकरणात राज्य सरकारवर कोणीही आणि कोणताही आक्षेप न घेता केवळ केंद्र सरकारलाच टारगेट करण्यात आले. कर्नाटकातील लेखक कलबुर्गी यांच्या हत्येबद्दल तेथील कॉंग्रेसला दोषी न मानता तेथे सोयीस्कर हिंदुत्ववाद्यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे केले जाते. पुणे - कोल्हापुरात दाभोलकर - पानसरे यांची हत्या झाल्यावरही हिंदुत्त्ववाद्यांवर आरोप केले जातात. त्यामुळे अशा घटना घडल्यानंतर केंद्र सरकार किंवा हिंदुत्त्ववाद्यांवर आरोप करणार्यांचा स्वार्थ नक्की कुठे गुंतला आहे हे सामान्यांना निश्चितच कळते आहे. कोंबडं झाकल्याने सुर्य उगवायचा राहत नाही हे या ढोंगी पुरोगाम्यांना केव्हा लक्षात येणार कोण जाणे?
- सागर सुरवसे
9769179823
(पुर्व प्रसिद्धी : दै. तरूण भारत, 'आसमंत', २८ फेब्रुवारी २०१६)
No comments:
Post a Comment