(संदर्भ : dictatorship of the proletariat.
http://parliamentofindia.nic.in/ls/debates/vol11p11.htm)
सागर सुरवसे
९७६९१७९८२३
twitter @sagarsuravase
कन्हैया हे तर केवळ एक प्यादे
शिवछत्रपतींचा इतिहास नावाचे पुस्तक इयत्ता चौथीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्यात स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त नावाचे एक प्रकरण आहे. तेव्हा त्याचा अर्थ उमजला नव्हता. पण, आता कन्हैाकांडामुळे त्या प्रकरणाची मला तीव्रतेने आठवण झाली.
शिवाजी महाराज हे महान होते. परकीय शत्रूंचा बंदोबस्त करणपूर्वी त्यांनी स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त केला होता. बाहेरील उघड शत्रूंपेक्षा हे घरातले शत्रू अधिक घातक असतात, हे त्यांनी ओळखले होते. अतिशय कठोर होऊन शिवरायांनी स्वकीय शत्रूंचा बिमोड केला होता.
बाहेरील शत्रूशी लढणे एकवेळ सोपे असते. घरातले शत्रू हे आपलेच असतात. कधी कधी रक्ताच्या नातेसंबंधातीलही असतात. संकुचित मानसिकता आणि स्वार्थ यातून बाहेर पडण्याची त्यांची मानसिकता नसते. समाज, धर्म, देश या गोष्टींचे यांना काहीही पडलेले नसते. त्यांच्या मनावर देशाच्या शत्रूंनी ताबा मिळवलेला असतो. यांना ओळखणे तसे कठीण असते. परंतु, सुदैवाने आपल्या देशातील घरभेद्यांचा बुरखा पुरता फाटला आहे.
देशद्रोहाचा आरोप असलेल कन्हैय नामक घरभेद्याला दिल्ली उच्च न्यायालयाने सहा महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला. तो मंजूर करताना कोर्टाने केलेली टिपण्णी अतिशय डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारे विचार न्यायव्यवस्थेने यानिमित्ताने मांडले आहेत. स्वकीय शत्रूंची टोळी मीडियामध्ये खूप प्रभावी आहे. इतके की न्यायालयाची ही टिपण्णी 3 मार्च 2016 च्या कोणत्याच दैनिकात छापून येणार नाही, याची काळजी घेतली गेली.
कन्हैयावर पानेच पाने खर्ची घालणार्या भारतातल्या प्रमुख सार्या दैनिकांनी (अपवाद दै. भास्कर) आणि झाडून सार्या वृत्तवाहिन्यांनी (अपवाद झी न्यूज) कन्हैयाला जामीन दिल्याची बातमी तर दिली, पण त्यावरील न्यायालयाची टिपण्णी मात्र दडवली. हा कंपू इतका प्रभावी की वृत्तसंस्थांवरही त्यांचा प्रभाव जाणवला. त्यामुळे छोट्या वृत्तपत्रांनाही न्यायालयाची टिपण्णी त्याच दिवशी मिळू शकली नाही. त्यामुळे कन्हैया जणु निर्दोष आहे असे वातावरण तयार केले गेले.
न्यायालयाने काय म्हटले होते? न्यायालयाने म्हटले, ''या खटल्याची चौकशी अद्याप प्राथमिक स्तरावर आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अशा कार्यक्रमाचे आयोजन केले, त्यात सहभागी झाले आणि देशविरोधी भावना निर्माण करणार्या घोषणा दिल्या. ते विद्यार्थी विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपला बचाव करू शकत नाहीत. हे एका संसर्गजन्य रोगाने पछाडलेले आहेत. हा रोग जीवघेणा ठरण्यापूर्वीच रोखावे लागेल किंवा त्यावर इलाज करावा लागेल. शरीरातील एखाद्या भागात पसरणार्या रोगावर जेव्हा औषध काम करत नाही तेव्हा त्या भागावर शस्त्रक्रिया करावी लागते. तरीही संसर्ग थांबत नसेल तर शरीराचा तो भाग कापून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही.''
याचा अर्थ कन्हैयाला मिळालेला जामीन हा देशद्रोहाच्या रोगावर केलेला इलाज आहे. इलाजानंतरही रोग हटला नाही तर त्याचे ऑपरेशन करावे लागेल. तरीही तो ऐकला नाही तर... सूज्ञास अधिक सांगणे न लागे.
त्याच टिपण्णीत न्यायाधिश आपल्या जवानांच्या त्यागाची आठवण करून देतात. ''जेएनयुसारख्या सुरक्षित परिसरामध्ये घोषणाबाजीच्या स्वातंत्र्याचा आनंद उपभोगणारे या गोष्टीचा विचारही करत नाहीत की, हे घोषणाबाजीचे स्वातंत्र्य तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपले सैनिक अतिशय बिकट परिस्थितीतही देशाची सुरक्षा करत आहेत. जे लोक अफझल गुरू आणि मकबूल भट्टचे फोटो छातीवर घेऊन त्यांचे उदात्तीकरण करत आहेत आणि राष्ट्रविरोधी घोषणाबाजी करत आहेत, त्यांना जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर जेथे ऑक्सीजनची कमतरता आहे अशा ठिकाणी पाठवले तर एक तासभर तरी तेथे उभे राहू शकतील का? जेएनयूमध्ये दिलेल्या घोषणा या मृत जवानांचा देह तिरंग्यात लपेटून घरी घेऊन जाणार्यांच्या परिवाराला निराश करणार्या आहेत.''
कन्हैयाच्या वकीलांनी भारतीय संविधानातील कलम 19 अ मधील विचार आणि अभिव्यक्ती स्वांतत्र्याचा आधार घेत त्याला निर्दोष सोडण्याची मागणी केली होती. मात्र त्याला श्रेया सिंघल विरूद्ध युनियन ऑफ इंडिया 2015 आणि जेएनयू प्रकरणाचा हवाला देत कोर्टाने म्हटले की, ''जेएनयू छात्रसंघाचा अध्यक्ष असल्याने आरोपीकडून ही अपेक्षा आहे की, विद्यापीठात काही राष्ट्रविरोधी हालचाली होत असतील तर तो यासाठी जबाबदार असेल. आपले संविधान नियमांच्या अंतर्गत नागरिकांना आपले वैचारिक आणि राजकी पक्षाशी संबंधित अधिकाराचे योग्य ते स्वातंत्र्य देते. मात्र या जामीन अर्जावर विचार करताना सर्व पक्षांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, हे स्वातंत्र्य टिकून आहे ते आपले जवान सियाचीनपासून ते कच्छपर्यंत जगातील सर्वात अवघड भागातही आपल्या सीमेला सुरक्षित ठेवतात, म्हणून. हा देशविरोधी घोषणांचा खटला आहे. ज्यामुळे देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोहचू शकतो. या उपर विद्यापीठातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत होण्यासाठी प्रयत्नशील रहावे. तसेच विद्यापीठ प्रशासनाने यावर वेळीच उपाय करावेत.''
न्यायालयाची टिपण्णी अतिशय निसंदिग्ध आहे. यामुळे कन्हैया सुधारेल असे कोणालाही वाटणे स्वाभाविक आहे. परंतु, जेएनयूमधील आणि देशातील अफझलप्रेमी डाव्यांची कार्यपद्धती माहीत असणारा कोणीही अशी भाबडी आशा ठेवणार नाही.
कोठडीतून बाहेर आल्यानंतर त्याच दिवशी 3 मार्चच्या रात्री जो माज कन्हैयाने जेएनयूमध्ये दाखवला, त्यातून या गोष्टीला पुष्टीच मिळाली. कन्हैया हे केवळ एक प्यादे आहे. एखाद्या कन्हैया किंवा उमर खालीदवर शस्त्रक्रिया करून हा रोग आटोक्यात येणारच नाही. येथील संस्कृती नाकारणारी विषवेल खोलवर पसरली आहे. या विषाचा प्रभाव आपल्या स्वकीयांवरच झालेला आहे. त्यामुळे तो उतरवणे आणखीनच कठीण आहे.
भारतातच स्वातंत्र्य मागणे हे तर नक्षल्यांचे तत्त्वज्ञान आहे. दंतेवाडा येथे 72 जवानांना नक्षल्यांनी क्रूरपणे ठार केले तेव्हा जेएनयूमध्ये जल्लोष करणारी ही पिलावळ चलाख आहे. लोकशाहीच्या मंदिरावर ˆ भारतीय संसदेवर हल्ला चढवणार अफझल गुरू या अतिरेक्याचे फोटो गळ्यात अडकवून तीनच आठवड्यांपूर्वी भारताच्या बरबादीच्या घोषणा देणारी अफझलप्रेमी गँग मंगळवारी तिरंगा फडकावताना दिसली. यावेळी मीडियातील आत्मा विकलेली टोळी कन्हैयाच्या पाठिशी दिसली.
अनेक जिहादी-मार्क्सचा बुरखा पांघरून जेएनयूमध्ये सक्रीय आहेत. हिंदू धर्माचे लचके तोडून आकाशातल्या बापाचे कळप वाढवणार मिशनर्यांचे एजंटही पडद्याआडून रसद पुरवत आहेत. हिंदुद्वेषाने आणि आत्मविस्मृतीने अंध झालेले स्वकीय कोणत्याही थराला, प्रसंगी देशाशी द्रोह करण्यासाठी उतावीळ झाले आहेत. अशावेळी देशप्रेमी नागरिकांना अधिक सजग व संघटितपणे काम करण्याला पर्याय नाही.
सागर सुरवसे
9769179823
( पूर्व प्रसिध्दी : दै. तरूण भारत, आसमंत पुरवणी, ६ मार्च २०१६)