देशाच्या नेतृत्वस्थानी नरेंद्र मोदी येऊन दोन वर्षे होत आहेत. पानसरे, कलबुर्गी, दादरी, वेमुला आदींच्या हत्या-आत्महत्या याच काळातल्या. या घटनांनी देशाला ढवळून काढले. या घटना दुर्दैवी आहेत, हे तर खरेच. पण, घटनांवरून जी हाकाटी पिटण्यात आली आणि येत आहे, ती देशाच्या ऐक्यावर ओरखडे ओढणारेच आहे. मागील दोन वर्षांत कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि जेएनयूमधील विद्यार्थी कन्हैया यांनी जी भूमिका घेतली ती वरवर पाहता देशभक्त मनाला वेदना देणारे आहे. परंतु, वास्तवात या दोघांनी देशावर जे उपकार करून ठेवले आहेत ते समजायला खूप वेळ लागेल.
कन्हैया हा कट्टर कम्युनिस्ट आहे. ते त्याने लपवूनही ठेवले नाही. कम्युनिस्ट देशाच्या स्वातंत्र्याआधीपासून देशाल्या तोडणार्या शक्तींच्या पाठिशी राहिले आहेत. नेताजींना कुत्रा म्हणून हिणवणारे कम्युनिस्टच होते. चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा चीनची तळी उचलत भारताला दोष देणारेही कम्युनिस्टच होते. नक्षल चळवळीचे समर्थन करणारेही कम्युनिस्टच आहेत. घटनेच्या चौकटीत राहून देशद्रोहाला हवा देणारे हे लोक देश पोखरून काढत आहेत. परंतु, त्यांचा हा देशद्रोह सर्वसामान्यांसमोर आजच्याइतक्या प्रभावीपणे कधीच आलेला नव्हता. कन्हैयाच्या निमित्ताने कम्युनिस्टांचा देशद्रोह चव्हाट्यावर आला त्याबद्दल कन्हैया अभिनंदनास पात्र आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांचे नाव घेत देशद्रोह लपवण्याचा प्रयत्न सेक्युलरवादी आणि कम्युनिस्टांनी केला. पण कन्हैयाच्या निमित्ताने इतिहासाची पाने उलटली जाऊ लागली. राज्यघटना निर्मिती होत असताना कम्युनिस्टांनीच डॉ. आंबेडकर यांना विरोध केल्याचे व खुद्द बाबासाहेबांनीच कम्युनिस्टांची लबाडी वेशीवर टांगल्याचे पुढे आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे होते. भारतद्रोही शक्तींबद्दल त्यांनी ६६ वर्षांपूर्वीच सावध केले होते. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. आंबेडकर हे संविधान सभेसमोर म्हणतात, ''कम्युनिस्ट आणि सोशालिस्ट हे दोन गट संविधानाचा धिक्कार करत आहेत. हे दोघे संविधानाचा निषेध कशाबद्दल करत आहेत? यांच्या निषेधाचे कारण संविधान वाईट आहे असे आहे काय? मी आत्मविश्वासाने सांगतो - नाही. ते खरे कारण नाहि. कम्युनिस्टांना हुकुमशाही हवी आहे. () आपले संविधान सांसदीय लोकशाहीवर अवलंबून आहे म्हणून कम्युनिस्ट त्याचा धिक्कार करत आहेत. सोशालिस्टांना दोन गोष्टी हव्या आहेत. १. जर सत्तेत आले तर भरपाई न देता खासगी मालमत्तेचे सरकार दरबारी विलीनीकरण करण्याची आजादी. आणि २. जर सत्तेत नाही आले तर त्यांना टीका करण्याची आजादी हवी आहे. इतकेच काय शासन संस्था (स्टेट) उलथून टाकण्याची आझादीही हवी आहे. त्यासाठी त्याना निरंकुश आजादी (फ्रीडम) व अमर्याद अधिकार घटनेत घालून हवे आहेत.'
(संदर्भ : dictatorship of the proletariat.
http://parliamentofindia.nic.in/ls/debates/vol11p11.htm)
(संदर्भ : dictatorship of the proletariat.
http://parliamentofindia.nic.in/ls/debates/vol11p11.htm)
कन्हैयामुळेच देश इतिहासात डोकावत आहे आणि इतिहासातून सत्य बाहेर येत आहे. कन्हैयाच्या उदयामुळे देशाला नवा नेता मिळाल्याची हाकाटी कम्युनिस्टांनी सुरू केली. ८८ वर्षांच्या नयना सेहगल म्हणाल्या की, 'मोदी यांच्यामुळे माझ्यासारख्या अनेकांना नैराश्य आले होते; आता मोदींना तोडीस तोड देईल असा तरुण - कन्हैया पुढे आल्याने नैराश्य दूर झाले आहे.' देशातील स्वयंघोषित पुरोगामी मित्रांच्या मनातील भावनाच त्यांनी मांडली आहे. मोदींमुळे पुरोगाम्यांमध्ये नैराश्य आल्याची कबुली देणार्या सेहगलआजी या पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांची बहीण विजयालक्ष्मी पंडित यांच्या कन्या. मोठ्या लखिका. पुरोगामी. नवर्याला सोडून एका ख्रिश्चन पुरुषासोबत विवाहाशिवाय अनेक दशके राहण्याचे धाडस त्यांनी केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुरस्कारवापसी मोहिमेत त्या सर्वात पुढे होत्या. नैराश्य आल्याच्या काळात त्यांच्यासारख्या शेकडो पुरोगामी विचारवंतांना कन्हैयाने दिलास दिला.
द हिंदूचे संपादक एन. राम यांनी तर मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ५ आणि ६ मार्चला झालेल्या एका कार्यक्रमात त्याचे तोंडभरून कौतुक केले. नंदीता दास, श्रीमाली, अशोक ढवळे, प्रा. चमन लाल, पी. साईनाथ, निखिल वागळे, कुमार केतकर, शशी कुमार असे अनेक डावे पुरोगामी मुखंड या कार्यक्रमाला हजर होते.
पण अरेरे! कन्हैयाने सार्या पुरोगाम्यांना तोंडघशी पाडले. काश्मीरात भारताचे सैनिक तेथील महिलांवर बलात्कार करतात असे तो म्हणाला. जेएनयूमध्ये उघड्यावर लघुशंका करणार्या कन्हैयाला एका विद्यार्थीनीने विरोध केल्याचे प्रकरण पुढे आले. या प्रकरणात तो दोषी आढळल्याने त्याला विद्यापीठाने दंड ठोठावल्याचेही पुढे आले आहे. निवेदिता मेनन नावाची प्राध्यापिका तर म्हणाली नागालँड, अरुणाचल, त्रिपुरा वगैरे प्रदेश चीनचे आहेत, ते चीनला देऊन टाका. कम्युनिस्टांची लबाडी माहित नसल्याने कम्युनिस्टांच्या कच्छपी लागलेल्या अनेक तरुणांचे डोळे यामुळे खाडकन उघडले. व्हाटसअप ग्रुपवर कन्हैयाचे कौतुक करणारे आमचे अनेक मित्र कम्युनिस्टांचे देशद्रोही रूप पुढे आल्याने सावध झाले. कम्युनिस्ट लबाडांना इतक्या मोठ्या प्रमाणात उघडे पाडण्याचे काम अलीकडच्या काळात कन्हैयाशिवाय कोणी केले नव्हते. वाईटातूनही चांगले घडते असे म्हणतात ते असे.
आता राहुलबाबा. या महाशयांनी थेट वि. दा. सावरकर यांना नकली ठरवले अन् चंद्रशेखर आझाद यांना असली क्रांतीकारक. यावरून पुन्हा इतिहासाची पाने चाळली जाऊ लागली. 'भगतसिंग यांची ङ्गाशी रद्द व्हावी, यासाठी क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांनी १९३१ मध्ये जवाहरलाल नेहरुंसोबत गुप्त बैठक घेतली. बैठकीतून परतताना इंग्रजांनी आझादांना घेराव घातला. गोळीबार सुरू केला. जखमी आझादांनी शरण जाण्यापेक्षा स्वत:ला संपवले. आझाद येणार याची गुप्त माहिती इंग्रजांना नेहरूंनीच पुरवली होती. त्यामुळे नेहरूंचा भारतरत्न परत घ्या', अशी मागणी चंद्रशेखर आझाद यांचे पुतणे सुजीत आझाद यांनी केली आहे. नेताजी सुभाषबाबूंना युद्ध गुन्हेगार संबोधून इंग्रजांची मदत करणारे नेहरूजी यांनी चंद्रशेखर आझादांशी गद्दारी केली असेल तर ही गंभीर बाब आहे.
बालबुद्धी राहूल यांनी असली-नकली देशभक्तीची चर्चा सुरू केलीच आहे तर नेहरूंवरील आरोपांच्या चौकशीसाठी आयोग नेमणे आवश्यकच आहे. दुसरीकडे भगतसिंग, मदनलाल धिंग्रा यांच्यासह शेकडो क्रांतीकारकांना वि. दा. सावरकरांनी प्रेरणा दिली आहे. सावरकरांनी लिहिलेले १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक म्हणजे क्रांतीकारकांची गीता असल्याचे उद्गार खुद्द भगतसिंगांनी काढले आहेत.राहूल आणि कन्हैयाला धन्यवाद. त्यांच्या अपरिपक्वपणामुळे का होईना देशवासीयांची इतिहासाची उजळणी होत असून सत्य समोर येत आहे.
'सडेतोड'
सागर सुरवसे
९७६९१७९८२३
twitter @sagarsuravase
सागर सुरवसे
९७६९१७९८२३
twitter @sagarsuravase
(प्रसिद्ध : दै. तरूण भारत, आसमंत पुरवणी, १३ मार्च २०१६)
No comments:
Post a Comment