Friday, 3 March 2017

केरळात कोण करतय संघ स्वयंसेवकांच्या हत्या?

गेल्या पाच सहा दशकात संघाच्या 270 हून अधिक स्वयंसेवकांची हत्या करण्यात आली.  केरळमधील 14 पैकी 10 जिल्ह्यात हे हत्यासत्र सुरू आहे. यामध्ये कन्नूर जिल्हा आघाडीवर आहे. कम्युनिस्टांच्या दृष्टीने कन्नूर जिल्ह्यातच माकपचा जन्म झाला. तेथूनच ही चळवळ पुढे सरकली. मात्र आजच्या घडीला त्या ठिकाणी संघाने मोठ्या प्रमाणात आपले कार्य उभे केले आहे. संघाच्या सेवाकार्यामुळे कम्युनिस्ट पार्टीतील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडून संघकार्यात झोकून दिले आहे. यामुळे चवताळलेल्या हिंसक वृत्तीच्या सीपीएमने संघटना सोडून जाणार्‍या कार्यकर्त्यांवर हल्ले चढवायला सुरूवात केली. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या जगातील सर्वात मोठ्या संघटनेवर त्याच्या स्थापनेपासून टीका होत आली आहे. अनेक भ्रष्ट बुद्धीजिवींकडून संघ विरोधी सूर देशभरात ऐकायला मिळतो. अर्थात या गोष्टींमुळेच संघ आणखी मजबूत झाला याचे भान विरोधकांना आले नाही. संघाचा उद्देश हा देशातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय भावना जागृत करणे, देशात एकता आणि एकात्मता प्रस्थापित करणे, लोकांनी स्वालंबनाचा मार्ग चोखाळून आपला उद्धार करणे हा आहे. मात्र त्यालाही अनेक राजकीय पक्ष आणि वैचारिक स्तरावरील संघटनांकडून विरोध आहे. कारण संघाच्या या सत्कार्याच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांचे समाजातले आणि राजकारणातले अस्तित्व संपुष्टात येत आहे. त्यामुळे वैचारिक स्तरावर विरोध असलेल्या संघटनांकडून सशस्त्र हल्ले सुरू आहेत. ही संघटना म्हणजे गोरगरिबांची कैवारी, मजूर-कामगार यांच्या न्यायासाठी लढणारी संघटना म्हणून आपल्याला परिचीत आहे. मात्र यांचे मनसुबे काही औरच आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्ष अर्थात डाव्या विचारसरणीचा पक्ष असं या संघटनेचं नाव आहे. नुकतीच केरळमधील जानेवारी महिन्यात घडलेली घटना या डाव्यांचा रक्तरंजित इतिहास अभ्यासायला भाग पाडते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सातत्याने आरोपांच्या फैरी झडत आल्या आहेत असाच अनेकांचा समज आहे. वास्तविक पाहता आरोपांसोबतच सशस्त्र हल्लेही मोठ्या प्रमाणात होत आहेत. नुकतीच जानेवारी महिन्यात कोणाही सामान्य माणसाचे हृदय पिळवटून टाकेल अशी घटना घडलीय. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या काही (गुंडांनी) कार्यकर्त्यांनी 18 जानेवारी 2017 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकाची निर्घृण हत्या केली. संतोष कुमार असे या हल्ल्यात मृत पावलेल्या 51 वर्षीय स्वंयसेवकाचे नाव आहे. मध्यरात्रीच्या वेळी संतोष कुमारा यांच्या झोपडीवजा घरात माकपचे गुंड घुसले. धारदार शस्त्रास्त्राने कुमारा यांच्यावर हल्ला चढविण्यात आला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे ही सर्व घटना त्यांच्या दोन मुले आणि पत्नीसमोर घडली. इतकी क्रूरता या हल्ल्यात होती. त्या दिवशी आणखी एका स्वयंसेवकावर हल्ला चढवून त्याला अर्धमेल्या अवस्थेत सोडण्यात आले. इतक्या हीन पातळीवर हे डाव्या विचारसरणीचे गुंड उतरलेत. या घटना म्हणजे केवळ योगायोग नसून यामागे एक थंड डोक्याने केलेले षडयंत्र आहे. 

केरळमध्ये मागील वर्षी मे 2016 मध्ये सत्तांतर झाले. या सत्तांतरानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरकार त्या ठिकाणी सत्तेत आले. त्यानंतर मात्र गेल्या वर्षभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सातत्याने सशस्त्र हल्ले होत आहेत. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतलेल्या पिनरायी विजयन यांनी गृहमंत्रीपदही आपल्याकडेच ठेवले आहे. त्यांनी सत्तेत आल्यावर लगेचच तत्कालीन पोलिस महासंचालकांची पदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर गेल्या वर्षभरात सातत्याने भाजप आणि संघ स्वयंसेवकांवर हल्ले चढवले जात आहेत. त्याची कोणतीच दखल मुख्यमंत्री घेताना दिसत नाहीत.

डाव्यांचा रक्तरंजीत इतिहास 

साधारणपणे 1940 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केरळमध्ये आपल्या कार्याचा शुभारंभ केला. त्यानंतर संघाने आपल्या सेवाकार्याच्या माध्यमातून केरळमध्ये मोठ्याप्रमाणात कार्यकर्त्यांचे जाळे विणले. त्यामुळे चवताळलेल्या डाव्यांनी आपला प्रभाव कमी होत असल्याचे पाहून संघ स्वयंसेवकांवर हल्ले चढविण्यास सुरूवात केली. 1969 कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी टेलरकाम करणार्‍या वडिक्कल रामकृष्णन या स्वयंसेवकावर हल्ला चढवून त्यांची निघृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे हा हल्ला करणार्‍या आरोपींमध्ये पहिले नाव हे केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांचे आहे. दुसरा आरोपी आहे तो म्हणजे माकपचे स्टेट सेक्रेटरी कोडियेरी बालकृष्णन यांचे सासरे राजू मास्टर यांचे. हत्येनंतर पोलिस तपासातील त्रुटी आणि राजकीय हस्तक्षेपामुळे या दोघांचीही यातून सुटका झाली. एकाद्या हत्येतील प्रमुख आरोपी असलेली व्यक्ती आज केरळचा मुख्यमंत्री असणे म्हणजे लोकशाहीची खुलेआम धिंड काढण्याचाच प्रकार आहे. 

डाव्यांनी घडवून आणलेल्या या हत्येचे सत्र इथेच थांबत नाही. गेल्या पाच सहा दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळपास 270 हून अधिक स्वयंसेवकांची हत्या करण्यात आली आहे. यामध्ये केरळमधील 14 पैकी 10 जिल्ह्यात हे हत्यासत्र सुरू आहे. यामध्ये कन्नूर जिल्हा आघाडीवर आहे. कम्युनिस्टांच्या दृष्टीने कन्नूर जिल्ह्यातच माकपचा जन्म झाला. तेथूनच ही चळवळ पुढे सरकली. मात्र आजच्या घडीला त्या ठिकाणी संघाने मोठ्याप्रमाणात आपले कार्य उभे केले आहे. संघाच्या सेवाकार्यामुळे कम्युनिस्ट पार्टीतील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडून संघकार्यात झोकून दिले आहे. मात्र चवताळलेल्या हिंसक वृत्तीच्या सीपीएमने संघटना सोडून जाणार्‍या कार्यकर्त्यांवर हल्ले चढवायला सुरूवात केली. 

हिंसेची परिसीमा म्हणजे, भाजपचे कन्नूर जिल्हा सरचिटणीस पन्नीयान्नूर चंद्रन आणि भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या के.टी. जयकृष्णन मास्टर यांच्या हत्या. जिल्हा सरचिटणीस पन्नीयान्नूर चंद्रन हे आपल्या पत्नीसह घरी परतत असताना त्यांच्यावर बॉम्ब फेकण्यात आला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर प्रदेश उपाध्यक्ष के.टी. जयकृष्णन मास्टर हे पेशाने शिक्षक होते. वर्गात विद्यार्थ्यांना शिकवत असताना विद्यार्थ्यांसमोरच कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या केली. क्रूरतेची ही परिसीमा क्वचितच एकाद्या विचारधारेच्या पक्षाने गाठली असेल. आजतागायत कन्नूर जिल्ह्यात जवळपास 82 संघ स्वयंसेवकांची हत्या करण्यात आली आहे.

केरळ मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातही हत्यासत्र 

कन्नूर जिल्ह्यातील पिनरायी हे विद्यमान मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांचा मतदारसंघ. या मतदार संघातच संघ स्वयंसेवक असलेल्या पिता-पुत्राची हत्या करण्यात आली आहे. 12 ऑक्टोबर 2016 रोजी आपल्या गर्भवती असलेल्या बहिणीसाठी मेडीकलमधून औषधे आणण्यासाठी गेेलेल्या रेमिथ उथमन या युवकाची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. या हत्येमुळे ती  गर्भवती बहिणी आणि रेमिथची आई आता हतबल झालेत. त्यांच्या घरातील दोन्ही पुरूषांची हत्या करून त्यांना संपविण्यात आले आहे. रेमिथच्या वडिलांची हत्या देखील याच कम्युनिस्ट गुंडांनी केली होती. 22 फेब्रुवारी 2002 रोजी बस चालक असलेले रेमिथचे वडील उथमन यांची वाहन चालवत असतानाच हत्या करण्यात आली होती. त्यामुळे रेमिथचे पूर्ण कुटंबच आता कायमचे संपवले गेले आहे. यापुढे रेमिथच्या कुटुंबाचा वंश संपविण्याचे काम या कम्युनिस्ट गुंडांनी केले आहे. एखादी विचारधारा वा पक्ष अशी माणसे आणि कुटुंबे संपवून नक्की काय साध्य करणार आहे हाच खरा प्रश्‍न उपस्थित होतो. 

एकीकडे महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर माध्यमातून बेछूटपणे हिंदुत्ववाद्यांवर आरोप केले जातात. कोणत्याही हत्येचे समर्थन करणे चुकीचेच आहे मात्र, केरळ मधील या अशा असंवैधानिक आणि देशविघातक कृत्याचे समर्थन करणे कितपत योग्य आहे? पत्रकार आणि माध्यमांनी आता कोणत्याही विचारधारेच्या बाहेर पडून एक जबाबदार संस्था वा व्यक्ती म्हणून सर्व घटनांकडे पाहणे, त्याला विरोध करणे गरजेचे आहे. कारण व्यक्ती कोणत्याही विचाराची असो तिला संपवून विचार नक्कीच संपवता येणार नाही हेच खरे.
- सागर सुरवसे,
 9769179823
 twitter @sagarsurawase

Saturday, 12 March 2016

राहुल, कन्हैयाचे थोर उपकार देश कधीच विसरणार नाही!

         देशाच्या नेतृत्वस्थानी नरेंद्र मोदी येऊन दोन वर्षे होत आहेत. पानसरे, कलबुर्गी, दादरी, वेमुला आदींच्या हत्या-आत्महत्या याच काळातल्या. या घटनांनी देशाला ढवळून काढले. या घटना दुर्दैवी आहेत, हे तर खरेच. पण, घटनांवरून जी हाकाटी पिटण्यात आली आणि येत आहे, ती देशाच्या ऐक्यावर ओरखडे ओढणारेच आहे. मागील दोन वर्षांत कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि जेएनयूमधील विद्यार्थी कन्हैया यांनी जी भूमिका घेतली ती वरवर पाहता देशभक्त मनाला वेदना देणारे आहे. परंतु, वास्तवात या दोघांनी देशावर जे उपकार करून ठेवले आहेत ते समजायला खूप वेळ लागेल. 
कन्हैया हा कट्टर कम्युनिस्ट आहे. ते त्याने लपवूनही ठेवले नाही. कम्युनिस्ट देशाच्या स्वातंत्र्याआधीपासून देशाल्या तोडणार्‍या शक्तींच्या पाठिशी राहिले आहेत. नेताजींना कुत्रा म्हणून हिणवणारे कम्युनिस्टच होते. चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा चीनची तळी उचलत भारताला दोष देणारेही कम्युनिस्टच होते. नक्षल चळवळीचे समर्थन करणारेही कम्युनिस्टच आहेत. घटनेच्या चौकटीत राहून देशद्रोहाला हवा देणारे हे लोक देश पोखरून काढत आहेत. परंतु, त्यांचा हा देशद्रोह सर्वसामान्यांसमोर आजच्याइतक्या प्रभावीपणे कधीच आलेला नव्हता. कन्हैयाच्या निमित्ताने कम्युनिस्टांचा देशद्रोह चव्हाट्यावर आला त्याबद्दल कन्हैया अभिनंदनास पात्र आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांचे नाव घेत देशद्रोह लपवण्याचा प्रयत्न सेक्युलरवादी आणि कम्युनिस्टांनी केला. पण कन्हैयाच्या निमित्ताने इतिहासाची पाने उलटली जाऊ लागली. राज्यघटना निर्मिती होत असताना कम्युनिस्टांनीच डॉ. आंबेडकर यांना विरोध केल्याचे व खुद्द बाबासाहेबांनीच कम्युनिस्टांची लबाडी वेशीवर टांगल्याचे पुढे आले आहे. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे होते. भारतद्रोही शक्तींबद्दल त्यांनी ६६ वर्षांपूर्वीच सावध केले होते. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. आंबेडकर हे संविधान सभेसमोर म्हणतात, ''कम्युनिस्ट आणि सोशालिस्ट हे दोन गट संविधानाचा धिक्कार करत आहेत. हे दोघे संविधानाचा निषेध कशाबद्दल करत आहेत? यांच्या निषेधाचे कारण संविधान वाईट आहे असे आहे काय? मी आत्मविश्वासाने सांगतो - नाही. ते खरे कारण नाहि. कम्युनिस्टांना हुकुमशाही हवी आहे. () आपले संविधान सांसदीय लोकशाहीवर अवलंबून आहे म्हणून कम्युनिस्ट त्याचा धिक्कार करत आहेत. सोशालिस्टांना दोन गोष्टी हव्या आहेत. १. जर सत्तेत आले तर भरपाई न देता खासगी मालमत्तेचे सरकार दरबारी विलीनीकरण करण्याची आजादी. आणि २. जर सत्तेत नाही आले तर त्यांना टीका करण्याची आजादी हवी आहे. इतकेच काय शासन संस्था (स्टेट) उलथून टाकण्याची आझादीही हवी आहे. त्यासाठी त्याना निरंकुश आजादी (फ्रीडम) व अमर्याद अधिकार घटनेत घालून हवे आहेत.'
(संदर्भ : dictatorship of the proletariat.
http://parliamentofindia.nic.in/ls/debates/vol11p11.htm)
कन्हैयामुळेच देश इतिहासात डोकावत आहे आणि इतिहासातून सत्य बाहेर येत आहे. कन्हैयाच्या उदयामुळे देशाला नवा नेता मिळाल्याची हाकाटी कम्युनिस्टांनी सुरू केली. ८८ वर्षांच्या नयना सेहगल म्हणाल्या की, 'मोदी यांच्यामुळे माझ्यासारख्या अनेकांना नैराश्य आले होते; आता मोदींना तोडीस तोड देईल असा तरुण - कन्हैया पुढे आल्याने नैराश्य दूर झाले आहे.' देशातील स्वयंघोषित पुरोगामी मित्रांच्या मनातील भावनाच त्यांनी मांडली आहे. मोदींमुळे पुरोगाम्यांमध्ये नैराश्य आल्याची कबुली देणार्‍या सेहगलआजी या पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांची बहीण विजयालक्ष्मी पंडित यांच्या कन्या. मोठ्या लखिका. पुरोगामी. नवर्‍याला सोडून एका ख्रिश्‍चन पुरुषासोबत विवाहाशिवाय अनेक दशके राहण्याचे धाडस त्यांनी केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुरस्कारवापसी मोहिमेत त्या सर्वात पुढे होत्या. नैराश्य आल्याच्या काळात त्यांच्यासारख्या शेकडो पुरोगामी विचारवंतांना कन्हैयाने दिलास दिला. 
द हिंदूचे संपादक एन. राम यांनी तर मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ५ आणि ६ मार्चला झालेल्या एका कार्यक्रमात त्याचे तोंडभरून कौतुक केले. नंदीता दास, श्रीमाली, अशोक ढवळे, प्रा. चमन लाल, पी. साईनाथ, निखिल वागळे, कुमार केतकर, शशी कुमार असे अनेक डावे पुरोगामी मुखंड या कार्यक्रमाला हजर होते. 
पण अरेरे! कन्हैयाने सार्‍या पुरोगाम्यांना तोंडघशी पाडले. काश्मीरात भारताचे सैनिक तेथील महिलांवर बलात्कार करतात असे तो म्हणाला. जेएनयूमध्ये उघड्यावर लघुशंका करणार्‍या कन्हैयाला एका विद्यार्थीनीने विरोध केल्याचे प्रकरण पुढे आले. या प्रकरणात तो दोषी आढळल्याने त्याला विद्यापीठाने दंड ठोठावल्याचेही पुढे आले आहे. निवेदिता मेनन नावाची प्राध्यापिका तर म्हणाली नागालँड, अरुणाचल, त्रिपुरा वगैरे प्रदेश चीनचे आहेत, ते चीनला देऊन टाका. कम्युनिस्टांची लबाडी माहित नसल्याने कम्युनिस्टांच्या कच्छपी लागलेल्या अनेक तरुणांचे डोळे यामुळे खाडकन उघडले. व्हाटसअप ग्रुपवर कन्हैयाचे कौतुक करणारे आमचे अनेक मित्र कम्युनिस्टांचे देशद्रोही रूप पुढे आल्याने सावध झाले. कम्युनिस्ट लबाडांना इतक्या मोठ्या प्रमाणात उघडे पाडण्याचे काम अलीकडच्या काळात कन्हैयाशिवाय कोणी केले नव्हते. वाईटातूनही चांगले घडते असे म्हणतात ते असे.
आता राहुलबाबा. या महाशयांनी थेट वि. दा. सावरकर यांना नकली ठरवले अन् चंद्रशेखर आझाद यांना असली क्रांतीकारक. यावरून पुन्हा इतिहासाची पाने चाळली जाऊ लागली. 'भगतसिंग यांची ङ्गाशी रद्द व्हावी, यासाठी क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांनी १९३१ मध्ये जवाहरलाल नेहरुंसोबत गुप्त बैठक घेतली. बैठकीतून परतताना इंग्रजांनी आझादांना घेराव घातला. गोळीबार सुरू केला. जखमी आझादांनी शरण जाण्यापेक्षा स्वत:ला संपवले. आझाद येणार याची गुप्त माहिती इंग्रजांना नेहरूंनीच पुरवली होती. त्यामुळे नेहरूंचा भारतरत्न परत घ्या', अशी मागणी चंद्रशेखर आझाद यांचे पुतणे सुजीत आझाद यांनी केली आहे. नेताजी सुभाषबाबूंना युद्ध गुन्हेगार संबोधून इंग्रजांची मदत करणारे नेहरूजी यांनी चंद्रशेखर आझादांशी गद्दारी केली असेल तर ही गंभीर बाब आहे.
बालबुद्धी राहूल यांनी असली-नकली देशभक्तीची चर्चा सुरू केलीच आहे तर नेहरूंवरील आरोपांच्या चौकशीसाठी आयोग नेमणे आवश्यकच आहे. दुसरीकडे भगतसिंग, मदनलाल धिंग्रा यांच्यासह शेकडो क्रांतीकारकांना वि. दा. सावरकरांनी प्रेरणा दिली आहे. सावरकरांनी लिहिलेले १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक म्हणजे क्रांतीकारकांची गीता असल्याचे उद्गार खुद्द भगतसिंगांनी काढले आहेत.राहूल आणि कन्हैयाला धन्यवाद. त्यांच्या अपरिपक्वपणामुळे का होईना देशवासीयांची इतिहासाची उजळणी होत असून सत्य समोर येत आहे.
'सडेतोड'
सागर सुरवसे
९७६९१७९८२३
twitter @sagarsuravase
(प्रसिद्ध : दै. तरूण भारत, आसमंत पुरवणी, १३ मार्च २०१६)

Saturday, 5 March 2016

कन्हैया कीर्तन आणि दिल्ली हायकोर्ट !

कन्हैया हे तर केवळ एक प्यादे

शिवछत्रपतींचा इतिहास नावाचे पुस्तक इयत्ता चौथीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्यात स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त नावाचे एक प्रकरण आहे. तेव्हा त्याचा अर्थ उमजला नव्हता. पण, आता कन्हैाकांडामुळे त्या प्रकरणाची मला तीव्रतेने आठवण झाली. 
         शिवाजी महाराज हे महान होते. परकीय शत्रूंचा बंदोबस्त करणपूर्वी त्यांनी स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त केला होता. बाहेरील उघड शत्रूंपेक्षा हे घरातले शत्रू अधिक घातक असतात, हे त्यांनी ओळखले होते. अतिशय कठोर होऊन शिवरायांनी स्वकीय शत्रूंचा बिमोड केला होता.
       बाहेरील शत्रूशी लढणे एकवेळ सोपे असते. घरातले शत्रू हे आपलेच असतात. कधी कधी रक्ताच्या नातेसंबंधातीलही असतात. संकुचित मानसिकता आणि स्वार्थ यातून बाहेर पडण्याची त्यांची मानसिकता नसते. समाज, धर्म, देश या गोष्टींचे यांना काहीही पडलेले नसते. त्यांच्या मनावर देशाच्या शत्रूंनी ताबा मिळवलेला असतो. यांना ओळखणे तसे कठीण असते. परंतु, सुदैवाने आपल्या देशातील घरभेद्यांचा बुरखा पुरता फाटला आहे. 
          देशद्रोहाचा आरोप असलेल कन्हैय नामक घरभेद्याला दिल्ली उच्च न्यायालयाने सहा महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला. तो मंजूर करताना कोर्टाने केलेली टिपण्णी अतिशय डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारे विचार न्यायव्यवस्थेने यानिमित्ताने मांडले आहेत. स्वकीय शत्रूंची टोळी मीडियामध्ये खूप प्रभावी आहे. इतके की न्यायालयाची ही टिपण्णी 3 मार्च 2016 च्या कोणत्याच दैनिकात छापून येणार नाही, याची काळजी घेतली गेली. 
      कन्हैयावर पानेच पाने खर्ची घालणार्‍या भारतातल्या प्रमुख सार्‍या दैनिकांनी (अपवाद दै. भास्कर) आणि झाडून सार्‍या वृत्तवाहिन्यांनी (अपवाद झी न्यूज) कन्हैयाला जामीन दिल्याची बातमी तर दिली, पण त्यावरील न्यायालयाची टिपण्णी मात्र दडवली. हा कंपू इतका प्रभावी की वृत्तसंस्थांवरही त्यांचा प्रभाव जाणवला. त्यामुळे छोट्या वृत्तपत्रांनाही न्यायालयाची टिपण्णी त्याच दिवशी मिळू शकली नाही. त्यामुळे कन्हैया जणु निर्दोष आहे असे वातावरण तयार केले गेले.   
न्यायालयाने काय म्हटले होते? न्यायालयाने म्हटले, ''या खटल्याची चौकशी अद्याप प्राथमिक स्तरावर आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अशा कार्यक्रमाचे आयोजन केले, त्यात सहभागी झाले आणि देशविरोधी भावना निर्माण करणार्‍या घोषणा दिल्या. ते विद्यार्थी विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपला बचाव करू शकत नाहीत. हे एका संसर्गजन्य रोगाने पछाडलेले आहेत. हा रोग जीवघेणा ठरण्यापूर्वीच रोखावे लागेल किंवा त्यावर इलाज करावा लागेल. शरीरातील एखाद्या भागात पसरणार्‍या रोगावर जेव्हा औषध काम करत नाही तेव्हा त्या भागावर शस्त्रक्रिया करावी लागते. तरीही संसर्ग थांबत नसेल तर शरीराचा तो भाग कापून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही.'' 
याचा अर्थ कन्हैयाला मिळालेला जामीन हा देशद्रोहाच्या रोगावर केलेला इलाज आहे. इलाजानंतरही रोग हटला नाही तर त्याचे ऑपरेशन करावे लागेल. तरीही तो ऐकला नाही तर... सूज्ञास अधिक सांगणे न लागे.
        त्याच टिपण्णीत न्यायाधिश आपल्या जवानांच्या त्यागाची आठवण करून देतात. ''जेएनयुसारख्या सुरक्षित परिसरामध्ये घोषणाबाजीच्या स्वातंत्र्याचा आनंद उपभोगणारे या गोष्टीचा विचारही करत नाहीत की, हे घोषणाबाजीचे स्वातंत्र्य तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपले सैनिक अतिशय बिकट परिस्थितीतही देशाची सुरक्षा करत आहेत. जे लोक अफझल गुरू आणि मकबूल भट्टचे फोटो छातीवर घेऊन त्यांचे उदात्तीकरण करत आहेत आणि राष्ट्रविरोधी घोषणाबाजी करत आहेत, त्यांना जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर जेथे ऑक्सीजनची कमतरता आहे अशा ठिकाणी पाठवले तर एक तासभर तरी तेथे उभे राहू शकतील का? जेएनयूमध्ये दिलेल्या घोषणा या मृत जवानांचा देह तिरंग्यात लपेटून घरी घेऊन जाणार्‍यांच्या परिवाराला निराश करणार्‍या आहेत.'' 
कन्हैयाच्या वकीलांनी भारतीय संविधानातील कलम 19 अ मधील विचार आणि अभिव्यक्ती स्वांतत्र्याचा आधार घेत त्याला निर्दोष सोडण्याची मागणी केली होती. मात्र त्याला श्रेया सिंघल विरूद्ध युनियन ऑफ इंडिया 2015 आणि जेएनयू प्रकरणाचा हवाला देत कोर्टाने म्हटले की, ''जेएनयू छात्रसंघाचा अध्यक्ष असल्याने आरोपीकडून ही अपेक्षा आहे की, विद्यापीठात काही राष्ट्रविरोधी हालचाली होत असतील तर तो यासाठी जबाबदार असेल. आपले संविधान नियमांच्या अंतर्गत नागरिकांना आपले वैचारिक आणि राजकी पक्षाशी संबंधित अधिकाराचे योग्य ते स्वातंत्र्य देते. मात्र या जामीन अर्जावर विचार करताना सर्व पक्षांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, हे स्वातंत्र्य टिकून आहे ते आपले जवान सियाचीनपासून ते कच्छपर्यंत जगातील सर्वात अवघड भागातही आपल्या सीमेला सुरक्षित ठेवतात, म्हणून. हा देशविरोधी घोषणांचा खटला आहे. ज्यामुळे देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोहचू शकतो. या उपर विद्यापीठातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत होण्यासाठी प्रयत्नशील रहावे. तसेच विद्यापीठ प्रशासनाने यावर वेळीच उपाय करावेत.''
न्यायालयाची टिपण्णी अतिशय निसंदिग्ध आहे. यामुळे कन्हैया सुधारेल असे कोणालाही वाटणे स्वाभाविक आहे. परंतु, जेएनयूमधील आणि देशातील अफझलप्रेमी डाव्यांची कार्यपद्धती माहीत असणारा कोणीही अशी भाबडी आशा ठेवणार नाही.       
  कोठडीतून बाहेर आल्यानंतर त्याच दिवशी 3 मार्चच्या रात्री जो माज कन्हैयाने जेएनयूमध्ये दाखवला, त्यातून या गोष्टीला पुष्टीच मिळाली. कन्हैया हे केवळ एक प्यादे आहे. एखाद्या कन्हैया किंवा उमर खालीदवर शस्त्रक्रिया करून हा रोग आटोक्यात येणारच नाही. येथील संस्कृती नाकारणारी विषवेल खोलवर पसरली आहे. या विषाचा प्रभाव आपल्या स्वकीयांवरच झालेला आहे. त्यामुळे तो उतरवणे आणखीनच कठीण आहे. 
         भारतातच स्वातंत्र्य मागणे हे तर नक्षल्यांचे तत्त्वज्ञान आहे. दंतेवाडा येथे 72 जवानांना नक्षल्यांनी क्रूरपणे ठार केले तेव्हा जेएनयूमध्ये जल्लोष करणारी ही पिलावळ चलाख आहे. लोकशाहीच्या मंदिरावर ˆ भारतीय संसदेवर हल्ला चढवणार अफझल गुरू या अतिरेक्याचे फोटो गळ्यात अडकवून तीनच आठवड्यांपूर्वी भारताच्या बरबादीच्या घोषणा देणारी अफझलप्रेमी गँग मंगळवारी तिरंगा फडकावताना दिसली. यावेळी मीडियातील आत्मा विकलेली टोळी कन्हैयाच्या पाठिशी दिसली.
अनेक जिहादी-मार्क्सचा बुरखा पांघरून जेएनयूमध्ये सक्रीय आहेत. हिंदू धर्माचे लचके तोडून आकाशातल्या बापाचे कळप वाढवणार मिशनर्‍यांचे एजंटही पडद्याआडून रसद पुरवत आहेत. हिंदुद्वेषाने आणि आत्मविस्मृतीने अंध झालेले स्वकीय कोणत्याही थराला, प्रसंगी देशाशी द्रोह करण्यासाठी उतावीळ झाले आहेत. अशावेळी देशप्रेमी नागरिकांना अधिक सजग व संघटितपणे काम करण्याला पर्याय नाही.

सागर सुरवसे
9769179823

( पूर्व प्रसिध्दी : दै. तरूण भारत, आसमंत पुरवणी, ६ मार्च २०१६)  

Monday, 29 February 2016

सत्तालोलुप पुरोगाम्यांचा प्रतिगामीपणा

        सध्या देशाभरात विविध समाजात फूट पाडण्याला, समाजाचा बुद्धीभेद करण्याला सुगीचे दिवस आहेत. त्यामुळेच काही तथाकथित अभिजन वर्गाकडून ठरवून सामान्यांची दिशाभूल केली जातेय. अर्थात हे काही आजच घडतेय असे नाही. त्याला 90 ते 95 वर्षाची पार्श्‍वभूभी आहे. फरक इतकाच की पूर्वी ती शाहू महाराजांविरोधात केली गेली आज ती केंद्र सरकारच्या विरोधात केली जातेय. शाहू महाराज हे संस्थानिक होते. त्यांच्या अंतर्गत समाजातील अनेक संस्थांना अनुदान दिले जात असत. मात्र त्यांच्याच अनुदानावर आपली पोटं भरणार्‍या काही कथित अभिजन वर्गाकडूनच त्यांच्यावर टीका केली जात असे. 
        टीका करण्याचे स्वातंत्र्य शाहू महाराजांनी नेहमीच मान्य केले होते. परंतु त्यांच्या भाषणातील सोयीचे आणि समाजाची दिशाभूल होईल अशी वाक्ये वृत्तात वा भाषणात संदर्भ म्हणून दिली जाऊ लागली त्यावेळी महाराज संतापले. व्यथित झाले. त्यावेळी त्यांनी एका भाषणात आपली भूभिका स्पष्ट केली. ते नाशिक येथील भाषणात म्हणतात, "'राजकारण'कर्त्यासारख्या मजवर टीका करणार्‍यास माझी विनंती आहे की, त्यांनी माझे समग्र भाषण देऊन प्रत्येक पॅराग्राफसमोर आपली स्वतःची जी टीका असेल ती छापावी. असे केले म्हणजे लोकांस आपले मत देण्यास बरे पडेल. अर्धाअधिक मजकूर गाळून थोडेसे अवतरण घेतल्याने, माझ्या सांगण्याचा विपर्यास होतो. 'राजकारण'कर्त्यास अशी विनंती करणे, हे मी मोठे धाडस करितो अशीही भीती वाटते. कारण मग त्यास विरूद्ध टीका करण्यास स्थळे कमीच सापडतील." हा शाहू महाराजांच्या भाषणातील एक उताराच त्याकाळच्या तथाकथित बुद्धीवादी अभिजन वर्गाचा खरपूस समाचार घेणारा ठरतो.
शाहू महाराजांवर जे टीका करत असत त्यापैकी बरेच जण महाराजांकडून मिळत असलेल्या अनुदानावरच जगत असत. विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांचीच बदनामी करण्यात आपला वेळ आणि बुद्धी खर्ची घालत. आजही नेमके तेच होत आहे. पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूट, हैदराबाद विद्यापीठ, जेएनयू विद्यापीठ या सर्व राष्ट्रीय शिक्षणसंस्था केंद्र सरकारच्या अनुदानावर चालतात. सरकार कोट्यवधींचा खर्च त्यावर करीत असते. त्याच पैशावर तेथील तथाकथित बुद्धीवंत, प्राध्यापक, विद्यार्थी आपल्या सर्व गोष्टी भागवतात. त्यांचे म्हणणे आहे की, आमचा सर्व खर्च आजवरच्या कॉंग्रेस सरकारप्रमाणे मोदी सरकारने उचचला पाहिजे. त्या बदल्यात आम्ही त्याच सरकारची निंदानालस्ती करू. त्यांच्या कामात अडथळे आणू. त्यांना शिव्या घालू. शिवाय असे केल्याबद्दल त्यांनी आम्हाला शाब्बासकी द्यावी. शाहू महाराजांचे नाव घेऊन त्यांचा पुरोगामी वारसा सांगणारे त्यांचे अनुयायी आज नेमके उलट वागत आहेत. अखिल समाजाला ओलीस ठेवणार्‍या वृत्तीची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी शाहू महाराजांनी मोहीम उघडली त्याच मक्तेदारीसाठी लढणार्‍यांना आज दुर्दैवाने पुरोगामी म्हणावे लागतेय.
    नव्या आशा, आकांक्षा घेऊन कार्यरत झालेल्या मोदी सरकारला बदनाम करण्याचा डाव सुरू झाला तो पुण्यातील एएफटीआयच्या विद्यार्थ्यांकरवी. गजेंद्र चौहान यांची एफटीआयच्या प्रमुखपदी निवड केल्यानंतर, चौहान त्या पदास लायक नाहीत अशी री ओढत तेथील विद्यार्थ्यांनी विरोधाला सुरूवात केली. आंदोलने केली. आजही ती सुरूच आहेत. मात्र एक मुद्दा ऐरणीवर येतो तो म्हणजे, आपले प्रमुख कोण असावे किंवा कोण नसावे हा अधिकार विद्यार्थ्यांना कोणी दिला? मुळातच एखाद्याची कार्यपद्धती समजून घेण्याआधीच त्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे, पोटात असलेल्या बाळाने आपला बाप निष्क्रीय असल्याने मला तो नको आहे असे म्हणण्याचाच हा प्रकार.
    दुसरी घटना आहे ती, हैदराबाद येथील रोहित वेमुला या विद्यार्थ्याची आत्महत्या. तेथेही अशाच पद्धतीने कांगावा करण्यात आला. मुळात रोहितची सुसाईड नोट वाचल्यानंतरच लक्षात येते की, त्याने आत्महत्या का केली. त्यात त्याने कोणाला दोषी मानले आहे. तरीही तो विषय बाजूला ठेवून केवळ त्याचे राजकारण करण्यात आले. एखाद्याच्या मृत्यूचा मसाला बनवून आपली नाव करण्याची ही डाव्यांची पद्धत काही आजची नाही.  येनकेनप्रकारेन सरकारच यात कसे दोषी आहे याचाच हा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. पुढची घटना आहे ती, दिल्लीस्थित जेएनयु विद्यापीठातील राष्ट्रविरोधी घोषणाबाजीची. या प्रकरणातही अशाच पद्धतीने कांगावा करण्यात आला. कारण कविता वाचनाच्या नावाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे स्वरूप बदलून त्याला विद्रोही स्वरूप देण्याचा प्रकार विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर विद्यापीठाने कार्यक्रमाची परवानगी रद्द केली. याचा राग मनात ठेवून तेथील फुटीरतावादी समर्थक उमर खालीद, कन्हैय्या कुमार यांच्या चमूने भारतविरोधी घोषणाबाजी केली. याबद्दल तेथील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमारला अटक झाली. याशिवाय कार्यक्रमाचा आयोजक उमर खालीद आणि संबंधित विद्यार्थी पळून गेला. त्यानंतर कन्हैय्या कुमारच्या बचावासाठी अखिल डाव्या संघटना आणि त्यांचे समर्थक पुढे सरसावले. सुरवातीला या विद्यार्थ्यांनी अशा घोषणा दिल्या नाहीत. विद्यार्थ्यांना हकनाक अशा घटनांमध्ये गोवले जात असल्याचा आरोप काही महाभागांनी टाहो फोडून सांगायला सुरूवात केली. त्यानंतर काही परिस्थितीजन्य पुरावे समोर आल्यानंतर मात्र याचा सूर बदलला. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी ते करू लागले. त्यानंतर एबीवीपीच्या कार्यकर्त्यांनीच देशविरोधी घोषणा दिल्याचा कांगावा सुरू केला. कांगावेपणाची ही हद्दच होती. 
    जर का उमर खालीदसह त्या मुलांनी घोषणा दिल्या नव्हत्या तर ते विद्यार्थी चार दिवसानंतर पोलिसांना शरण का आले? याशिवाय राहुल गांधी, अरविंद केजरीवाल वा अन्य डाव्यांनी या विरोधात कोर्टात धाव का नाही घेतली? न्यायव्यवस्थेवर यांचा विश्‍वास नाही का? त्यांना ही गोष्ट पक्की ठाऊक होती की, या प्रकरणात आपण जर का कोर्टात गेलो तर आपण उघडे पडू. कारण घोषणा देण्यार्‍यांचे चेहरे आज ना उद्या समोर येणारच आहेत. याशिवाय कॉंग्रेस आणि डाव्यांनी केलेल्या दादरी प्रकरणाचे भांडवल. ज्या अखलाकची हत्या करण्यात आली तो मुस्लिम होता. त्याची हत्या ही गोमांस खाल्ल्ङ्माने करण्यात आल्याचा कांगावा या पुरोगामी मुखंडांनी केला होता. त्यानंतर त्याचा निषेध म्हणून पुरस्कार वापसीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. या सर्व प्रकारणांकडे पाहिल्यास एक स्पष्ट आहे की, हे सर्वप्रकार घडले कोठे? रोहित वेमुलाची घटना घडली आंध्रप्रदेश आणि तेलंगना राज्यात म्हणजेच तेलगू देसम पक्षाचे चंद्रबाबू नायडू आणि टीआरएस पक्षाची सत्ता असलेल्या के. सी. राव यांच्या सरकारमध्ये. दादरी हत्या प्रकरण घडले समाजवादी पार्टीची सत्ता असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये. जेएनयु प्रकरण घडले केजरीवाल यांची सत्ता असलेल्या दिल्लीत. म्हणजे याती एकही प्रकरणात राज्य सरकारवर कोणीही आणि कोणताही आक्षेप न घेता केवळ केंद्र सरकारलाच टारगेट करण्यात आले. कर्नाटकातील लेखक कलबुर्गी यांच्या हत्येबद्दल तेथील कॉंग्रेसला दोषी न मानता तेथे सोयीस्कर हिंदुत्ववाद्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाते. पुणे - कोल्हापुरात दाभोलकर - पानसरे यांची हत्या झाल्यावरही हिंदुत्त्ववाद्यांवर आरोप केले जातात. त्यामुळे अशा घटना घडल्यानंतर केंद्र सरकार किंवा हिंदुत्त्ववाद्यांवर  आरोप करणार्‍यांचा स्वार्थ नक्की कुठे गुंतला आहे हे सामान्यांना निश्‍चितच कळते आहे. कोंबडं झाकल्याने सुर्य उगवायचा राहत नाही हे या ढोंगी पुरोगाम्यांना केव्हा लक्षात येणार कोण जाणे?

 - सागर सुरवसे
 9769179823

(पुर्व प्रसिद्धी : दै. तरूण भारत, 'आसमंत', २८ फेब्रुवारी २०१६)

Sunday, 21 February 2016

देशद्रोह्यांचे समर्थन म्हणजे, देशाच्या एकात्मतेलाच सुरुंग...

  
     गेल्या दहा दिवसापासून दिल्लीस्थित जेएनयु विद्यापीठात देशद्रोही घोषणा देणाऱ्यांचा अनेक नेत्यांना उमाळा आला आहे. त्यामुळे घटनेच्या दुसऱ्याच दिवशी कॉंग्रेसचे शहजादे राहुल गांधी तिथे डेरेदाखल झाले. विपश्यना करून आल्यापासून ते अधिक सक्रीय झाल्याचे दिसत आहेत. त्यामुळेच त्यानी संपूर्ण घटना काय आहे हे जाणून घेण्यापूर्वीच "संविधानाने दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आमच्यापासून कोणीही हिरावून घेवू शकत नाही." असे वक्तव्य केले.  वास्तवात त्या ठिकाणी "अफलज हम शरमिंदा है, तेरे कातील जिंदा है." "भारत की बरबादी तक, जंग हमारी जारी रहेगी." "पाकिस्थान जिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबाद." अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यावर राहुल गांधी यांनी केलेले विधान म्हणजे, "उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग" असेच म्हणावे लागेल. त्यानंतर दुसरे अवतारपुरुष, "तापलेल्या तव्यावर आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी" सरसावले ते म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. हे दोघेही संवैधानिक पदावर असलेले नेते. मात्र केवळ मोदी आणि भाजपा विरोधाने त्याना पूर्णपणे ग्रासल्याने ते अशा देशविरोधी घोषणा देणाऱ्यांचे उघडपणे समर्थन करत सुटले आहेत.
   यापूर्वीही राजकारणापोटी अनेकदा काँग्रेसने अल्पसंख्यांक या गोंडस नावाखाली अनेकांचे लांगुलाचन केले आहे. मात्र आता राहुलबाबा त्याहूनही पुढारलेले निघाले. देशाद्रोह्याना अशाप्रकारे पाठीशी घालणे म्हणजे देशाच्या एकात्मतेलाच सुरुंग लावण्याचा हा प्रकार आहे. देशद्रोही घोषणा दिल्याच्या आरोपाखाली ए.आय.एस.एफचा कार्यकर्ता कन्हैय्या कुमारवर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला. त्यानंतर मात्र उठता-बसता संविधानाचा आदर कारणार्यानी पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली. इथेच खरी गोम आहे.
याठिकाणी कन्हैय्या कुमार हा एक प्यादा आहे. कन्हैय्या हा ए.आय.एस.एफ.चा कार्यकर्ता असल्यानेच सर्व डावे आणि कथित सेक्युलर फोर्सेस त्याच्या बचावासाठी सरसावले. कारण कन्हैय्या यात दोषी सापडल्यास आपले बिंग फुटेल आणि एबीवीपीसह तमाम उजव्या संघटनांना आपल्याविरोधात प्रचार करण्यास बळ मिळेल. केवळ या एकाच भीतीने ही सर्व मंडळी भेदरली. त्यामुळे कथित विवेकवादी आपला विवेक हरवून बसले. आपण देशविरोधी घोषणाबाजी कारानार्यांना पाठीशी घालतोय याचे भानही त्यांना राहिले नाही.
   डावी मंडळी नेहमीच नक्षलवाद्यांचे समर्थन करत असतात. मात्र आता ते अशा युवकांच्या पाठीशी राहून नक्की कोणता संदेश देत आहेत? याच प्रकरणात देशातील डाव्या मंडळीनी जेएनयु प्रकरणातील दोषींचे समर्थन सुरू केले आहे. त्यानी आता नवाच युक्तीवाद मांडायला सुरुवात केली आहे. तो म्हणजे, कन्हैय्याचे समर्थन करणारे देशद्रोही असतील तर मग नथुराम गोडसेचे समर्थन करणारे, त्याचे पुतळे बसवणारे देशद्रोही नव्हेत का? मुळातच माध्यमांना हाताशी धरून सामान्य जनतेत भ्रम निर्माण करणे ही डाव्यांची सुरूवातीपासूनची पद्धत. त्यानुसार यावेळी त्यांनी तोच मार्ग अवलंबला आहे. सारासार विवेकी विचार केल्यास हे लक्षात येईल की, नथुराम गोडसेनी जे केले त्याची शिक्षा त्याला मिळाली आहे. याउपर महात्मा गांधी हे एक व्यक्ती होते. त्यामुळे नथुरामने खून केला की देशद्रोह केला हा वादाचा एक वेगळा विषय आहे. कोणतीही व्यक्ती राष्ट्रापेक्षा मोठी नसते. त्यामुळे देशविरोधी घोषणा देणे आणि एखाद्या व्यक्तीचा खून करणे यात निश्चितच फरक आहे. इथे नाथूरामाने केलेल्या कृतीचे समर्थन नसून डाव्यांनी चालविलेली दिशाभूल दाखवणे क्रमप्राप्त आहे.
      कॉंग्रेसची डूबती नैय्या वाचविण्यासाठी राहुलबाबा आणि आपली राजकीय वलय वाढविण्यासाठी केजरीवाल आणखी कोणत्या थराला जाणार आहेत कोण जाणे? विकासाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या मोदी सरकारच्या कामांना झाकोळून टाकण्यासाठीचा हा प्रयत्न तर नाही ना? असा प्रश्न निश्चितच येतो.

सागर सुरवसे,
९७६९१७९८२३
(पुर्व प्रसिद्धी, दै. तरुण भारत, 'आसमंत' पुरवणी, २१ फेब्रुवारी २०१६)

Saturday, 13 February 2016

इतिहासाचार्य शरदचंद्र पवार यांना पत्र..!




आदरणीय शरदचंद्रजी पवार,
सादर प्रणाम.        
आपल्या नावाआधी इतिहासाचार्य ही पदवी लावण्याचे कारण म्हणजे आपण या देशातील महान इतिहासतज्ञ असल्याचा साक्षात्कार माझ्यासह संपूर्ण देशवासीयांना प्रथमच ठळकणे झाला आहे. आपण मुरब्बी राजकारणी आहात, कुशल प्रशासक आहात इतकी माहिती आम्हा पामरांना होती. परंतु, या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये देशभरातील ७० हून अधिक महान इतिहासकारांच्या मेळाव्याचे अध्यक्षपद आपण भूषविलंत. त्या ठिकाणी व्यक्त झालेले इतिहासाविषयीचे आपले अगाध ज्ञान पाहून आम्ही स्तिमित झाले आहोत. मी काही इतिहासातील तज्ञ नाही, पण इतिहासाविषयी जिज्ञासा असल्याने आनंदित होऊन हे पत्र लिहीत आहे. 'केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार भारतीय इतिहासाची सरळसरळ मोडतोड करत असून, चुकीची तथ्ये आणि घटना सत्य म्हणून पुढे आणली जात आहेत. खरा इतिहास बदलून भारताची विविधता संपवण्याचे कारस्थान चालू आहे. धर्मनिरपेक्ष देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचे प्रयत्न हाणून पाडू. आणि इतिहासाचे विकृतीकरण रोखण्यासाठी एकवटलेल्या इतिहासतज्ज्ञांच्या खांद्याला खांदा लावून लढू.'अशी ग्वाही तुम्ही इतिहासकारांच्या बैठकीत दिली. यामुळे आम्हाला ङ्गार हायसे वाटले.आपला इतिहासाविषयीचा दृष्टीकोन फार उदार आहे, हे सर्वज्ञात आहे. मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले तेव्हा आपण याची चुणूक दाखवली होती. हिंदूंच्या मनात बिचार्‍या मुस्लिमांबद्दल द्वेषभावना भडकून मुस्लिमांचे नुकसान होऊ नये यासाठी मुस्लिमबहूल भागातही बॉम्बस्फोट झाल्याची खोटी माहिती आपण दिली होती. ते तुम्ही अभिमानाने सांगितलेही आहे. तुमचा हा दृष्टीकोन इतिहास लेखनातही येणे नितांत गरजेचे आहे.
         अयोध्येत राममंदिर पाडून बाबरी मशिद बांधण्यात आली होती, हे न्यायालयात सिद्ध झाले आहे. त्याचे पुरातत्त्वीय पुरावे पुढे आले आहेत. जातीयवादी मंडळी याचे भांडवल करत इतिहास लेखन करण्याची शक्यता आहे. तसे केल्यास विनाकारण देशातील मुस्लिम बांधवांकडे द्वेषबुद्धीने पाहिले जाईल. असे होऊ नये यासाठी विख्यात विचारवंत तारेक फतेह यांच्या उद्गाराचा शब्दार्थ (भावार्थ नव्हे) आदर्श मानून इतिहासलेखन झाले पाहिजे, यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा असे वाटते. तारेक फतेह म्हणतात, ''आम्ही मुसलमानांनी राममंदिर पाडून बाबरी मशिद बांधली नाही. दुष्ट हिंदूंनी बाबरी मशिदीच्या खाली जमिनीत जाऊन राममंदिर बांधले.'' जातीयवादी लेखक अशा घटनांना वेगळे वळण देण्यासाठीच टपलेले असतात. डॉ. एस. एल. भैरप्पासारखे जातीयवादी लेखक म्हणतात, ''मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्याशी नातं जोडून आपण त्यांचेच वारसदार' या भावनेत आपण अडकणार असू तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारीही स्वीकारावी लागेल.''अशी मांडणी करून औरंगजेब, टिपू सुलतान, अफजलखान आदी ऐतिहासिक महापुरुषांबद्दल प्रेम असणार्‍यांबद्दल विनाकारण गैरसमज पसरवले जाते. हे रोखले पाहिजे. भैरप्पा यांच्यासारखे बुद्धीभेदी इतिहासकार म्हणतात, की औरंगजेबाने काशी विश्‍वनाथ मंदिराचा विद्ध्वंस केला. कुणी जातीयवादी लेखक म्हणतो की, 'टिपू सुलतानाने शेकडो मंदिरे ध्वस्त केली. हजारो हिंदूंना बाटवून मुस्लिम केले. शेकडो स्त्रीयांवर बलात्कार केले.' महापुरुषांचे मूल्यमापन अशा घटनांवरून करायचे नसते हे हिंदुत्वादी, जातीयवादी लेखकांना खडसावून सांगण्याची वेळ आली आहे. विख्यात लेखक गिरीश कर्नाड यांनी जातीयवादी इतिहासकारांना अतिशय तडाखेबंद उत्तर दिले आहे. कर्नाड म्हणतात, 'टिपू सुलतानने फक्त केरळ, तामिळनाडूत कत्तली, बलात्कार आणि धर्मांतर केले. पण त्याने कर्नाटकात आदर्श राजकारभार केला. त्यामुळे त्याला धर्मांध म्हणता येणार नाही.' आहा... काय महान विचार आहेत. अशा विचारांच्या थोर इतिहासकारांना एकत्र करून एक ऐतिहासिक कार्य आपण केले आहे. कर्नाड यांच्यासारख्या इतिहासकारांना भारतरत्न दिले पाहिजे, यासाठी तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आग्रह धरला पाहिजे असे आम्हास वाटते. असे झाले तरच खर्‍या इतिहासकारांना चालना मिळेल. मुंबईत जमलेले सारे इतिहासकार कर्नाड यांच्याप्रमाणेच पुरोगामी विचारांचे होते. अशा इतिहासकारांची देशाला खूप गरज आहे. ही गरज तुम्ही वेळीच ओळखली, त्याबद्दल तुम्हाला खूप धन्यवाद.मे महिन्यात देशभरातील हजारावर इतिहासतज्ज्ञांचे संमेलन मुंबईत बोलावण्याची घोषणाही तुम्ही केली. मे महिन्यातील परिषदेत इतिहासातील मोडतोड रोखण्यासाठी संस्थात्मक उपाय शोधण्यात येतील, असा निर्णय बैठकीत झाला. या बैठकीत सांगितल्याप्रमाणे गेल्या ५०० वर्षांत झाली नाही तेवढी इतिहासाची मोडतोड गेल्या वर्षभरात मोदी सरकारने केली आहे. हे रोखण्यासाठी आपण पुढे आलात याचा आम्हाला अभिमान वाटतो.आजच्या घटना या उद्या इतिहास बनतात. इशरत जहॉं या तरुणीविषयी आपल्या पक्षाने घेतलेल्या भूमिकेला खरोखरच तोड नाही.
            इतिहासकारांच्या बैठकीत आपण म्हणालात की, ''विरोधी मत मांडणार्‍यांना देशात सध्या राष्ट्रद्रोही ठरवले जात आहे. हिंदू राष्ट्राचा अजेंडा भारतीय राज्यघटनेविरोधी असून, तो आपण हाणून पाडला पाहिजे. भारतीय इतिहासाचे चाललेले विद्रूपीकरण लोकशाहीसमोरील सर्वात मोठा धोका आहे.'' शरदचंद्रजी आपण द्रष्टे आहात. आपले भाष्य होऊन आठवडाही उलटला नाही तोवर आपले भाकित खरे ठरताना दिसत आहे. ''दिल्लीच्या जेएनयूमध्ये काही विद्यार्थ्यांनी अङ्गझल गुरूची पुण्यतिथी साजरी केली. कुणी पाकिस्तान जिंदाबाद म्हटले. कुणी भारताचे हजार तुकडे पाडू म्हटले. कुणी काश्मीर स्वतंत्र करू म्हटले तर कुणी केरळ स्वतंत्र करू म्हटले.'' विरोधी विचार मांडले म्हणून जेएनयूमधील विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. याला हिंदुत्ववादी शक्तीच जबाबदार आहेत. अशा आततायी भूमिकेमुळे लोकशाहीला ङ्गार मोठा धोका उत्पन्न झाला आहे. अशा कठीण काळात आपल्या रूपाने एक दमदार नेता इतिहासाचे रक्षण करण्यासाठी पुढे सरसावला, ही गोष्ट सुवर्णाक्षरांनी नोंदवली गेली पाहिजे. भारताच्या पुरोगामी इतिहासातील सोनेरी पान म्हणून या घटनेची नोंद होईल, याची आम्हाला खात्री आहे. मे महिन्यात होणार्‍या ऐतिहासिक पुरोगामी इतिहास संमेलनाला मनापासून शुभेच्छा!

जाता जाता...
मे महिन्यातील संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून हाफीज सईद किंवा बगदादी यांना निमंत्रण देऊन भारतातील जातीयवाद्यांना सणसणीत चपराक लगावाल, अशी आशा आहे.

Saturday, 30 January 2016

मोफत कुराणवाटप केल्याने गैरसमज कसे दूर होणार?


                         मजहब नही सिखाता, आपस में बैर रखना. अर्थात कोणताही धर्म वैरभाव शिकवत नाही. खरंय. शिकवू नये. गुण्यागोविंदाने राहण्यातच जीवनातला खरा आनंद आहे. इस्लाम अर्थात मुसलमान धर्म हा वैरभाव शिकवत नाही. हा धर्म शांतता शिकवणारा धर्म आहे. मुस्लिम धर्माबद्दलचे गैरसमज दूर केले पाहिजेत, असे सोलापुरातील जमियत अहले हदिस या संस्थेला वाटले. त्यासाठी या संस्थेने २४, २५ आणि २६ जानेवारी रोजी सायंकाळी सोलापुरातील शिवछत्रपती रंगभवनसमोरील मोकळ्या मैदानात मोठा शामीयाना उभारला. शेकडो गैरमुसलमानांना इस्लाममधील शांततेचा उपदेश केला. मुसलमान धर्म कसा शांततावादी आहे, हे पटवून देण्याचा पोटतिडकीने प्रयत्न केला. यावेळी शेकडो गैरमुसलमान लोकांना पवित्र कुरआन (कुराण) या ग्रंथाचे मोफत वाटप करण्यात आले. जमियत अहले हदिस या संस्थेचा उद्देश खूप चांगला आहे. मुस्लिम धर्माबद्दल असलेले गैरसमज दूर करणे हा तो उद्देश. 
                मूठभर अतिरेकी इस्लाम धर्माचे नाव घेऊन दहशतवादी कृत्ये करतात. त्यामुळे दहशतवादाशी काही संबंध नसलेल्या सर्वच मुस्लिमांकडे संशयाने पाहिले जाते. देशद्रोही कारवायांशी काडीचाही संबंध नसणार्‍या ९९.९९ टक्के मुस्लिमांना याचा विनाकारण त्रास होतो. असे होणे खूपच वेदनादायी आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे. मुस्लिम धर्माबद्दल असलेले गैरसमज दूर व्हायला पाहिजेत, यावर कोणाचेही दुमत असणार नाही. परंतु, हे कार्य मोफत कुराण वाटप आणि गैरमुसलमानांचे प्रबोधन करून होणे केवळ अशक्य आहे. जमियत अहले हदिस या संस्थेचा उद्देश चांगला असला तरी त्यांना समस्या नीट समजलेली नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. इस्लाम धर्माबद्दल गैरसमज कोणात आहे? काही मुसलमानांमध्ये आहे आणि हिंदूंमध्येही आहे. मुसलमानांमध्ये मुसलमान धर्माबद्दल काय गैरसमज आहेत, हिंदूंमध्ये मुसलमान धर्माबद्दल काय गैरसमज आहेत, याचा नीट अभ्यास न करता उपाय करण्याचा प्रयत्न जमियत संस्थेने केला आहे, असे वाटते. प्रश्न समजून न घेता उपाय करणे म्हणजे आजार न समजून घेता औषध देण्यासारखे आहे. यामुळे रुग्णाचे नुकसान होण्याचीच अधिक शक्यता आहे. काही मुसलमानांमध्ये इस्लामबद्दल गैरसमजूत आहे आणि हा गट मुसलमानांमध्ये खूप प्रभावी आहे, हे आधी मान्य करावे लागेल. याला कोणताही पर्याय नाही. उदाहरण म्हणून इसिस ही अतिरेकी संघटना पाहा. नावातच इस्लामी राज्य ही शब्दावली आहे. आपण भले म्हणू या लोकांचा इस्लाम धर्माशी काही संबंध नाही. पण हे अतिरेकी इस्लामचा आधार घेऊनच दहशतवाद माजवत आहेत, हे नाकारता येणार नाही. म्हणजेच इसिसच्या कामात आनंद मानणार्‍या मुसलमानांमध्ये इस्लामविषयी गैरसमजूत आहे. ही गैरसमजूत काय आहे?
                इसिससारख्या अतिरेक्यांच्या म्हणण्यानुसार हे जग दार उल इस्लाम केले पाहिजे. म्हणजे संपूर्ण जग इस्लाममय केले पाहिजे. याचा अर्थ जे मुसलमान नाहीत ते काफीर आहेत. आणि काफीरांच्या विरुद्ध युद्ध म्हणजे जिहाद. काफीरांना मारणे म्हणजे अल्लाहचे पवित्र कार्य असा त्यांचा तर्क. या तर्कानुसार भारतात अधिक संख्येने काफीर आहेत. या काफीरांना मारण्यासाठी भारत देशात इसिसचे ३० हजार स्लीपर सेल असल्याची माहिती पुढे आली आहे. ३० हजार ही संख्या काही कमी नाही. अशा लोकांमध्ये इस्लामची चुकीची समजूत कोण तयार करतं? त्यांना शोधून त्यांचे प्रबोधन केले पाहिजे. जोवर अशा अतिरेकी मानसिकतेच्या लोकांचे प्रबोधन होणार नाही, तोवर समस्या सुटणे शक्य नाही.
बहुसंख्य हिंदूंच्या मनात मुसलमानांबद्दल काय गैरसमज आहेत? हिंदू-मुसलमान संबंध हा आज कळीचा मुद्दा होऊन बसला आहे. वृत्तपत्रे, दूरदर्शन या माध्यमातून यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या जवळजवळ रोजच चर्चा सुरू असते. गेली सुमारे १२०० वर्षे आपल्या देशाला छळणार्‍या या प्रश्नाचे वास्तव स्वरूप आणि तो सुटण्याचा व्यवहारिक मार्ग याचे इतिहासाच्या प्रकशात तटस्थपणे चिंतन झालेच नाही. त्यामुळे हिंदूंच्या मनात खूप प्रश्न आहेत. गैरसमजही फार आहेत. हे सारे गैरसमज इस्लामचे नाव घेऊन शेकडो हिंदूंची कत्तल करणार्‍या गझनी, बाबर, औरंगजेब, टिपू आदी राज्यकर्त्यांमुळे तयार झाले. अलीकडे लादेन, बगदादी, अझल गुरू, कसाब, इशरत जहॉं अशा शेकडो जिहादी अतिरेक्यांमुळे गैरसमज वाढत गेले. इस्लामचे नाव पुढे करून हजारो लोकांची कत्तल आणि लाखो लोकांना देशोधडीला लावत देशाचे तुकडे करून पाकिस्तान बनवणार्‍या जिनांसारख्या धर्मपिसाटांमुळेही गैरसमजात भर पडली. इस्लामचे नाव घेऊन नंगानाच करणार्‍या अतिरेक्यांमुळे इस्लामचा अपमान होतो असे वाटून पेटून न उठणारा समाज प्रेषिताचे व्यंगचित्र काढले म्हणून पाच - पाच लाखांच्या संख्येने रस्त्यावर उतरतो. जाळपोळ करतो. अनियंत्रित होतो. म्यानमारमध्ये मुस्लिमांवर अत्याचार झाले म्हणून लोखोच्या संख्येत मुंबईच्या आझाद मैदानावर जमतो. बेभान होतो. अशा घटनांमुळे मुसलमान धर्माबद्दल गैरसमज निर्माण झाले आहेत. दोनच आठवड्यांपूर्वी प. बंगालमधील मालदा जिल्ह्यात दीड लाख मुसलमान रस्त्यावर उतरले. पोलिस चौकी जाळली. दहशत माजवली. उत्तर प्रदेशातील कोणीतरी प्रेषितांबद्दल अपशब्द वापरल्याचे निमित्त त्याला होते. इस्लामचे नाव घेऊन देशद्रोही कामे करणार्‍यांच्या विरोधात असा त्वेष का दिसत नाही, हा प्रश्न हिंदूंना पडला तर तो दूर कसा करणार?
            देशाचे तुकडे झाल्यानंतर पाकिस्तानात २४ टक्के असलेले हिंदू आज दीड दोन टक्क्यांवर उरले. बांगलादेशात ३७ टक्के असलेले हिंदू आज ८ टक्क्यांवर आले आणि भारतात ११ टक्के असलेले मुसलमान १४ टक्क्यांवर पोहोचले. पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन्ही देश इस्लामी आहेत. तिथला हिंदू सुरक्षित का नाही? ही यादी खूप मोठी आहे. प्रश्न आणि गैरसमज तर खूप आहेत. हे गैरसमज हिंदूंना मोफत कुराणवाटप केल्यामुळे दूर कसे होणार? हिंसेचा आधार घेऊन इस्लामच्या नावाखाली दहशत माजवणार्‍यांचे, लेखणी आणि वाणी याचा आधार घेत धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अतिरेकी प्रवृत्तीला पाठिशी घालणार्‍यांचे प्रबोधन करणे अधिक गरजेचे नाही काय? थोडक्यात, वरील वस्तुस्थिती क्षणभर दूर सारली तरी एक मुलभूत मुद्दा शिल्लक राहतो. या मुद्द्यावर स्पष्टता आली तरी हिंदू-मुस्लिम एकतेच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होईल असे वाटते.
                 आमचा धर्म सत्य आहे, तसे पृथ्वीतलावरील इतरही धर्म सत्य आहेत, अशी हिंदू धर्माची मान्यता आहे. मुसलमान धर्माप्रमाणेच पृथ्वीतलावरील इतरही धर्म सत्य आहेत, असा विचार मुसलमान धर्मीयांकडून ठळकपणे सांगितले जाणार काय? कारण, मुस्लिम धर्माबद्दलचे गैरसमज दूर करण्याच्या नावाखाली मुसलमान धर्मच केवळ एकमेव खरा धर्म आहे, असे सांगण्याचा प्रयत्न रंगभवन येथे सुरू होता. इतर धर्मांचे अस्तित्व मान्य केले नाही तर जगात शांतता येणे कसे शक्य आहे? हिंदू धर्म हा उपासनेच्या स्वातंत्र्यावर विश्वास असलेला धर्म आहे. या धर्मात मूर्तीपूजक आहेत. निराकाराची उपासना करणारे आहेत. नास्तिक आहेत. नद्या, झाडे, पर्वत, सागर, निसर्ग, विविध देवता, महापुरूष यांची पूजा करणारेही आहेत. प्रत्येकाला उपासनेचे स्वातंत्र्य आहे. उपासनेचे हे स्वातंत्र्य इस्लामला मान्य नाही, असेही सांगण्याचा प्रयत्न सुरू होता.
               आम्ही मूर्तीपूजक आहोत. आम्ही गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार, शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापनार, हनुमानाच्या मूर्तीची पूजा करणारच. बहुईश्वरवादी, मूर्तीपूजक यांची कोंडी करा, त्यांना धडा शिकवा, असे कुराणाच्या आधारे सांगितले जात असेल तर गैरसमज कसे दूर होणार? धर्मग्रंथातल्या अशा श्लोकांचा अर्थ कसा लावणार?

सागर सुरवसे,
सोलापूर
(पूर्व प्रसिद्धी - ३० जानेवारी २०१६, दै. तरुण भारत, आसमंत )
भ्रमणध्वनी - 97 69 179 823 / 96 65 899 823