Tuesday, 12 January 2016

योद्धा संन्याशाचे युवा पिढीला आवाहन


          दिवस सुरू झाला' असे म्हटल्याबरोबर जितक्या स्वाभाविक अटळतेने 'सूर्य उगवला' या शब्दांची आठवण होते, तितक्याच अपरिहार्यपणे स्वामी विवेकानंद म्हटले म्हणजे शिकागो धर्मपरिषदेतील त्यांच्या विश्‍वविजयी व्याख्यानाचा उल्लेख होतो. स्वामीजींच्या त्या निर्णायक, वैचारिक दिग्विजयाला १२२ वर्षे पूर्ण झाली तर त्यांच्या निर्वाणालाही ११३ वर्षे उलटून गेली तरीही त्यांच्या विश्‍वविजयाच्या स्मृती अजरामर आहेत, पुढेही पिढ्यांपिढ्यांपर्यंत राहतील. 
जेमतेम तीनचार मिनिटांचे भाषण, तेही एका विशाल विद्वतसभेसमोर एका अनाकर्षक संन्याशाने केलेले. हिंदू धर्म, हिंदुस्थान यांच्याविषयीची कमालीची उपेक्षा, टवाळी - यांनी सारा आसमंत भरून गेला असल्याच्या अवस्थेत स्वामीजींनी हे भाषण केले. आणि एका, पहिल्या वाक्यातच - निव्वळ संबोधनातच स्वामीजींनी ती विद्वतसभा जिंकली, भारून टाकली. असे काय होते त्यांच्या भाषणात ? पश्‍चिमेत जाऊन हिंदू - पौर्वात्य चिंतनाची वैशिष्ट्‌ये सांगणारे स्वामी विवेकानंद हे पहिलेच विद्वान होते काय ? राजाराम मोहन रॉय, केशवचंद्र सेन, प्रतापचंद्र मुजुमदार यांच्यासारखे श्रेष्ठ कतृत्ववान पुरुष त्याआधी पश्‍चिमेत गेेले होते. पाश्‍चिमात्यांकडून सन्मानीतही झाले होते. खुद्द शिकागो धर्मपरिषदेतही एच. धरमपाल, वीरचंद गांधी, किंझा हिराई इ. विद्वान उपस्थित होते. त्यांनीही आपल्या भाषणांमधून पाश्‍चात्य जगतात हिंदू धर्माविषयी पसरलेल्या गैरसमजांबाबत प्रखर भाष्य केले होते. मात्र स्वामीजींच्या प्रतिपादनाने उपस्थितांच्या उपस्थितांच्या अंत:करणात उमटवलेला ठसा सर्वात ठळक आणि चिरस्थायी होता.
 शिकागो धर्मपरिषदेच्या विज्ञान विभागाचे प्रमुख मर्विन मेरी स्नेल यांनी 'होप' या नियतकालिकाच्या संपादकीय पत्रव्यवहारात स्वामीजींचे केलेले वर्णन यासंदर्भात बोलके आहे. त्यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे म्हटले, ''... स्वामी विवेकानंद हे हिंदुत्व विचारांचे सर्वात महत्त्वाचे आणि वैशिष्ट्‌यपूर्ण प्रतिनिधी ठरले... धर्मपरिषदेतील ते सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी व्यक्ती होते यात कुठलीही शंका नको... त्या काळात व्यापक प्रचलित असलेल्या, हिंदू तत्त्वज्ञानाविषयीच्या विकृत आणि आंग्ळाळलेल्या समजुतींना इतक्या सडेतोड आणि अस्सल भाषेत (स्वामी विवेकानंदांच्या आधी) कोणीही ठाम उत्तर दिले नव्हते... अशा थोर पुरुषाला येथे पाठवल्याबद्दल अमेरिका भारताची ऋणी आहे. आणि त्यांच्यासारख्या विद्वानांना पाठवावे, अशी प्रार्थना करते... !''
शिकागो धर्मपरिषदेत आणि त्यानंतर अमेरिका, इंग्लंडमध्ये विविध ठिकाणी केलेल्या अनेक भाषणांमधून स्वामीजींनी हिंदू चिंतनाची जी प्रमुख वैशिष्ट्‌ये तर्कशुद्ध भाषेत मांडली, त्यांच्यामध्येच विवेकानंदांच्या विश्‍वविजयाचे गमक सामावले आहे. 'बंधू-भगिनींनो...' या सहज स्फूर्त उद्गारांनी वैदिक दृष्टीकोनाचे 'विश्‍वबंधुत्व' अधोरेखित केले.
''रुचीनां वैचित्र्यात् ऋजुकुटिलनानापथजुषाम्‌नृणाम् एको गम्य: त्वमसि पयसाम् अर्णव इव |'' या श्‍लोकाच्या उच्चारातून स्वामीजींनी हिंदू तत्त्वज्ञानाने जोपासलेल्या सर्व पंथ समादराच्या आस्थेचे ठळक दर्शन घडवले. 'तू पापी आहेस' या ख्रिस्ती प्रतिपादनाच्या व्यक्तिमात्राला अधोमुख करणार्‍या शिकवणीच्या पार्श्‍वभूमीवर 'तू अमृताचा पुत्र आहेस' अशी व्यक्तीचा माथा उन्नत करणारी - उमेद आणि चैतन्यदायी आत्मविश्‍वास जागवणारी वैदिक मांडणी स्वामीजींनी प्रकाशमान केली. वेदांत आणि विज्ञान, श्रद्धा आणि विवेक, गूढवाद आणि तर्क, एकेश्‍वरवाद आणि बहुईश्‍वरवाद या परस्परविरोधी भासणार्‍या तत्त्वांमधील खोलवरचा समन्वय यांनी उलगडून दाखवला. 
निसर्गातील विविधतेतल्या एकत्वाचे विलोभनीय प्रतिबिंब मानवी समूहात - समाजात कसे पडले आहे याचे दर्शन त्यांनी घडवले. पोथीबंद तर्कटातून 'धर्म' संकल्पनेला मुक्त करणारे, धर्माच्या गतिशीलतेचे (डायनॅमिझम) तर्कशुद्ध विवेचन करून स्वामीजींनी धर्मातच सार्‍या मानवतेचे सुखशांती आणि हित सामावले आहे असे ठामपणे सांगितले. मुख्य म्हणजे त्यांच्या प्रतिपादनात यथार्थ स्वमताभिमान, स्पष्टता आणि निखळ तर्कशुद्धता ठासून भरलेली होती. त्यामुळे पाश्‍चात्य मिशनरी मानसिकतेवर कठोर आघात करणारे असूनही त्यांचे भाषण अभ्यासक, विद्वानांना आणिा सामान्य जनांनाही प्रभावित करून गेले. विशेष म्हणजे पाश्‍चात्यांसमोर सनातन वैदिक धर्माचे ठणकावून समर्थन करणार्‍या स्वामीजींनी धर्माच्या नावाखाली पाखंड, अंधरुढी यांची जोपासना करणार्‍या स्वकीयांनाही तितक्याच कठोर शब्दांत सुनावले. जातीभेद, श्रेष्ठ कनिष्ठता भाव, अनभ्यस्त अहंभाव यांनी पछाडलेल्या लब्धप्रतिष्ठितांची त्यांची परखड निर्भत्सना केली. 
पश्‍चिमेत विजयपताका फडकावून परतल्यानंतर कोलंबो ते अल्मोरा या प्रवासात जागोजागी त्यांनी केलेली भाषणे याची साक्ष देतात. (कोलंबो ते अल्मोरा या प्रवासातील भाषणे ''भारतीय व्याख्याने'' नावाच्या पुस्तकात संकलित आहेत. तरुणांनी ते पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे.) त्यांच्या सार्‍या मांडणीला थोर तपस्या आणि सखोल चिंतनाचा तसेच अभ्यासपूर्ण बुद्धीवादाचा भक्कम आधार होता. त्यामुळेच त्यांच्या मार्गदर्शनातील प्रेरकशक्ती अत्यंत प्रबळ होती.
महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या श्रेष्ठ स्वातंत्र्यसेनानींनी स्वामीजींच्या संदेशापासून प्रेरणा घेतलीच; पण जगदीशचंद्र बोसांसारखे वैज्ञानिक, रवीद्रनाथ टागोर, सुब्रमण्यम भारती, लिओ टॉलस्टॉय, रोमां रोलां यांच्यासारखे प्रतिभावान साहित्यिक, जमशेटजी टाटांसारखे ज्येष्ठ उद्योजक, महर्षि अरविंदांसारखे ज्ञानयोगी... अशा समाजजीवनाच्या सर्व महत्त्वपूर्ण क्षेत्रातील दिग्गज स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने भारून गेले. आज स्वामीजींची दीडशेवी जयंती दिमाखाने साजरी करत असताना त्यांच्या श्रेष्ठतेचे स्मरणरंजन करणे पुरेसे ठरेल काय ? 
ज्येष्ठ विचारवंत मानवेंद्रनाथ रॉय यांनी म्हटले आहे, ''यशस्वी महापुरुषाचे श्रद्धेने स्मरण करणे सोपे आहे. मात्र त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पुढे चालवणे कठीण आणि महत्त्वाचे असते...'' हे कठीण काम पुढे नेण्यातच पुरुषार्थ सामावला आहे. आणि असा पुरुषार्थ देशाच्या युवा शक्तीत सामावलेला आहे, असा दृढविश्‍वास स्वामीजींनी व्यक्त केला आहे. ''...सुदृढ, उत्साही, श्रद्धावान आणि समर्पित माणसे हवीत. माझा युवा पिढीवर फार विश्‍वास आहे... सिंहाच्या हृदयाची ही माणसं सर्व प्रश्‍नांवर उत्तरं शोधून काढतील... तुमच्यातच सर्व शक्ती वास करत आहेत अशी श्रद्धा तुमच्यापैकी प्रत्येकाच्या मनात जागी होऊ दे. मग तुम्ही सर्व हिंदुस्थान चैतन्याने भारून टाकाल आणि त्यानंतर बंधूंनो, जगातील सर्व राष्ट्रांमध्ये जाल आणि त्या त्या राष्ट्राच्या घडणाीत हिंदू तत्त्वांचं फार मोठे योगदान कराल...''शक्ती, श्रद्धा, समर्पण आणि हिंदू तत्त्वचिंतनावरील प्रगाढ विश्‍वास या शिदोरीच्या आधारे दिग्विजयी बंधुत्व प्रस्थापित करण्याचे आवाहन स्वामीजींनी युवा पिढीला केले आहे. जगात सर्वत्र आज अस्थिरता, असुरक्षा आणि अनाचाराचे थैमान सुरू आहे. आर्थिक वर्चस्वातच सुख समृद्धी सामावली आहे, अशा एकांगी समजुतीचा आंधळेपणाने पाठलाग करणारी पश्‍चिम (युरोप-अमेरिका) आर्थिक तडाख्यानेच हादरून जाऊ लागली आहेत. इजिप्त, लिबिया, सीरिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे सारे आखाती, अरबी, इस्लामिक क्षेत्र स्वत:च उभ्या केलेल्या नृश्यंस हिंसाचाराच्या - भस्मासुराच्या विक्राळ दाढांखाली भरडले जाताना दिसतेय. व्यापक आणि श्रेयस चिंतनावर आधारलेली भारतीय - हिंदू जीवनशैलीच या अशांतीला पूर्णविराम देऊ शकेल असा विश्‍वास जगभरातल्या धुरिणांमध्ये जागा होऊ लागला आहे. आत्मभान आणि आत्माभिमान यांच्या सहाय्याने युवक-युवतींनी पुढे सरसावणे हेच योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे आवाहन आहे !

लेखक : सागर सुरवसे,
सोलापूर.
9769179823
sagar.suravase@gmail.com

#swamivivekanand #Vivekanand #स्वामीविवेकानंद 

No comments:

Post a Comment