सोलापूर शहराची मानसिकता नक्की कशी आहे? हे कोणीही सांगू शकणार नाही. कारण या शहरातील नागरिकांची मानसिकता अभ्यासणे आणि ती विषद करणे कोणत्याही मानसशास्त्र तज्ज्ञाला शक्य नाही. हा विषय काढण्याचे कारण म्हणजे नुकतीच पार पडलेली विस्मयकारक विधानपरिषदेची निवडणूक. जे अशक्य आहे ते येथे शक्य होते आणि त्या उलटही. भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक आणि आघाडीतर्ङ्गे राष्ट्रवादीचे विद्यमान विधानपरिषदेचे आमदार दिपक साळुंखे यांच्यात लढत झाली. या लढतीत जिल्हा परिषद, महानगरपालिका, आठ नगरपालिका असे मिळून एकूण ३९८ मतदार होते. त्यापेैकी कॉंग्रेसकडे १७८, राष्ट्रवादीकडे ९२ मते होती. या दोहोंची बेरीज ही दिपक साळुंखे यांनी विषयी करण्यास पुरेशी होती. त्या उलट परिचारकांकडे हक्काची अशी केवळ साठ ते सत्तरच मते होती. तरीही परिचारक निवडूण आले. ही एवढी एकच गोष्टच आपली मती गुंग करणारी आहे. अर्थात यात घोडेबाजार झाला असला तरीही त्याचा परिणाम उमेदवाराला १४१ अधिकची मते मिळवून देण्याइतका बिलकूलच नव्हता. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या या मानहानीकारक अपयशाला कारणीभूत आहेत. पेरावे तसे उगवते हा नियम साधारणपणे आपल्याला अनुभवायला मिळतो. या विधानपरिषदेच्या रणधुमाळीत पेरलेले उगवले खरे मात्र, पेरले एक आणि उगवले भलतेच. या निवडणुकीच्या निकालाचे वैशिष्ट्य असे की, इथे विजयापेक्षा पराभवाचीच चर्चा अधिक झाली. कारण हाताशी केवळ साठ मते असताना कोणी इतकं मताधिक्य घेऊच कसे शकते? याचेच चिंतन करण्याची गरज आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे की, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्याच मतदारांनी आणि विशेषतः नेत्यांनी परिचारकांना मदत केली. पण ती का केली? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. असं म्हणतात की, वाङ्ग ङ्गार काळ कोंडून ठेवता येत नाही, अन्यथा स्ङ्गोट अटळ असतो. या निवडणुकीतही त्याचाच प्रत्यय पाहायला मिळाला. वर्षभरापुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरच्या जनतेने सुशीलकुमार शिंदे यांना नाकारले. त्यानंतर विधानपरिषदेत पुरेसे संख्याबळ असतानाही त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी दिपक साळुंखेंच्या माध्यमातून शिंदे यांचाच पराभव केला. कारण १४ डिसेंबर रोजी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या एका बैठकीनंतर सुशीलकुमार शिंदे यांनी आत्मविश्वासाने सांगितले होते की, कॉंग्रेस पक्ष दिपक आबांच्या पाठीशी आहे त्यामुळे ते निवडूण आले असे मी आजच जाहीर करतो. विजयाची केवळ औपचारिकता राहिलीय. मग या पराभवाची जबाबदारी कोणाची? शिंदे यांचा असा मुखभंग करण्यासाठी कोण सिद्ध झालेआहे. नक्की कोणाची मानहानी झाली आहे. यातच सारे काही दडले आहे. नेतृत्त्व कितीही मोठे असो, पुढची पिढी सक्रीय झाल्यानंतर त्याने आपले ज्येष्ठत्व स्विकारून सर्व सुत्रे पुढच्या नेतृत्त्वाकडे सुपूर्द करण्यातच मोठेपणा असतो. अन्यथा पदरी निराशाच येते. सोलापुरातही त्याचेच दर्शन घडले. गेल्या तीस-पस्तीस वर्षापासून जिल्ह्यात विजयसिंह मोहिते-पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांचे नेतृत्त्व प्रामुख्याने पाहायला मिळाले. परंतु आता चित्र वेगळे आहे. आजच्या घडीला जिल्ह्यातील कॉंग्रेसचे नेतृत्त्व दिलीप माने, सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडे आहे. वरकरणी हायकमांडजवळ शिंदे यांचा वट्ट असला तरी जनमानसात मात्र माने-म्हेत्रेे यांचेच नेतृत्त्व पाहायला मिळते. गेल्या काही वर्षात या नेत्यांनी आपले आर्थिक आणि मनुष्यबळ मोठ्याप्रमाणात वाढवले. त्यामुळे त्यांना हालवणे किंवा जीर्ण करणे तितके सोपे राहिलेले नाही. जिल्हातील स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यात माने-म्हेत्रेच आघाडीवर आहेत. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे, आजच्या आघाडीच्या नेत्यांमध्ये काही अपवाद वगळता कसल्याही प्रकारचं हाडवैर नाही. त्यामुळेच जिल्हा दुध उत्पादक संघ, डीसीसीचे अध्यक्षपद यात सामंजस्याने निवडी झाल्याचं पाहायला मिळालं. या सर्व पार्श्वभूमिवर सुशीलकुमार शिंदे यांचा सहभाग कुठेच नाही. त्यामुळे शिंदे यांच्या इच्छाशक्तीला निश्चितच मर्यादा आल्या आहेत. एकेकाळी जे चेले होते ते आता वरचड झालेत यात शंका नाही. हा निसर्गनियमच आहे. कॉंग्रेसमध्ये ही अशी स्थिती असली तरी राष्ट्रवादीसह इतर पक्षातही काही वेगळे घडत नाही. राष्ट्रवादीचे आजचे नेतृत्त्व नक्की कोणाकडे आहे? विजयसिंह मोहिते-पाटील की दिलीप सोपलांकडे? ज्येष्ठतेनुसार मोहिते पाटील यांचे नाव जरी आघाडीवर येत असले तरी, डीसीसी बँकेच्या संचालक निवडीत मात्र त्यांच्या पुत्राला कधीकाळी त्यांच्याच पक्षात असलेल्या समाधान आवताडेंच्या आव्हानाला सामोरे जावे लागते. अशी आव्हानं येणं ही कशाची नांदी आहे. मोहिते-पाटील यांचे जिल्ह्यातील नेतृत्त्व खिळखिळे करण्यात पक्षातील मंडळीच असल्याचे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे दिपक साळुंखेंच्या प्रचारासाठी झटणारे मोहिते-पाटील त्यांना निवडूण का आणू शकले नाहीत? हे या निमित्ताने समोर आले आहे.दिपक साळुंखे यांच्या प्रचारासाठी खुद्द पक्षाचे नंबर दोनचे नेते अजित पवार यांनीसुद्धा सोलापुरात मुक्काम ठोकला होता. प्रत्येक मतदाराशी स्वतः आपल्या स्टाईलने चर्चा केली होती. हुतात्मा स्मृतीमंदिर मध्ये झालेल्या द्विपक्षीय मेळाव्यात त्यांनी, महापालिका निवडणूक वर्षावर आहे. दगाङ्गटका कराल तर याद राखा असा सज्जड दमही दिला. मात्र त्याचा परिणाम विपरीत झाला. पराभवाच्या कारणामागे हा घटकही महत्त्वाचा आहे. याशिवाय दिपक साळुंखेंकडे नुकतंच जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. त्यांच्या भगिनी या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. त्यात पुन्हा एकदा त्यांनाच विधानपरिशषदेची उमेदवारी देणं हे कितपत योग्य असा सवालही पक्षातील मंडळी उघडपणे बोलत होती. त्यामुळे केवळ आपल्या मर्जीतला कार्यकर्ता म्हणून जर का एकाच्याच पारड्यात सर्व पदे घातली तर परिणाम काय येतो हे या नेतृत्त्वाने समजून घेणे गरजेचे असते. अन्यथा मूखभंग अटळ असतो.
सागर सुरवसे,
सोलापूर
- ९७६९१७९८२३
#vidhanparishad #solapur #sushilkumarshinde #ncp #dipaksalunkhe #prashantparicharak
No comments:
Post a Comment